पुणे :- जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांचे आधारकार्ड काढण्यांसाठी मशिन कार्यरत आहेत. या कामामध्ये काही गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी. सदर तक्रारीची गंभीर दखल घेवून थेट गुन्हा दाखल केला जाईल. असा इशारा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांची प्रमुख उपस्थितीत होती.
सदर बैठकीत मावळ तालुक्यासाठी आधार कार्ड मशिन उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे यामध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली होती. त्यानुसार सक्त कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. त्याचप्रमाणे जुन्नर- आंबेगाव तालुक्यात महा-ईसेवा केंद्रात पावतीपेक्षा जास्तीचे पैसे घेत असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व तहसिलदारांना कळवून तपासणी करुन अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात विविध प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याची तक्रारीवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली . याबाबत सर्व आरोग्य केंद्राची तपासणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.
या बैठकीत अन्न व औषध प्रशासन, वजनमापे, पिक-विमा, शिक्षण विभागातील सेवा रासायनिक फवारणीच्या औषधे जास्तीच्या दराने खरेदी करणे, एस. टी.महामंडळ, विद्युत विभागाबाबत आपआपल्या भागातील तक्रारी उपस्थिती अशासकीय सदस्यांनी मांडल्या याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच यापुढे अशासकीय सदस्यांनी लेखी स्वरुपात तक्रारी द्याव्यात. त्यानुसार संबंधित विभागांकडून लेखी खुलासा व अहवाल मागविण्यात येईल असे सूचित केले.या बैठकीस अशासकीय सदस्य सर्वश्री अरुण वाघमारे, तुषार झेंडे, प्रमोद जाधव, सतीश जयवंत साकोरे, यशवंत पिंगळे, सुतारज्ञानेश्वर, अशोक अग्रवाल, विश्वनाथ लोंढे-पाटील, सर्जेराव जाधव, बाळासाहेब औटी. आदी उपस्थित होते.