पुणे, दि.10: जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील यांनी आज दौंड येथील गोवा गल्ली व सिंधी गल्ली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
यावेळी विलगीकरण कक्ष, नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सेवा- सुविधा, भोजन सुविधा याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी घेतली. तसेच येथील कोरोना परिस्थितीबाबत महसूल, पोलीस विभाग व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
श्री. राम म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी सोशल डिस्टनसिंगची व स्वच्छतेच्या खबरदारीची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होवू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची माहिती अद्ययावत करुन त्यांच्या तपासणीवर भर देऊन अधिक काळजी घ्यावी, असे श्री. राम यांनी सांगितले. नागरिकांनी देखील स्वयंशिस्त पाळण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज चा वापर व सोशल डिस्टनसिंग पाळून कोरोनवर मात करावी, असे आवाहन श्री. राम यांनी नागरिकांना केले.
दौंड तालुक्यात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, स्वॅब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी त्यांनी माहिती घेतली.
यावेळी पोलीस उप अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.