मुंबई, : आपत्कालीन परिस्थितीत प्रसार माध्यम हे शासन आणि जनतेतील दुवा असून आपत्ती निवारणासाठी शासनाने आणि प्रसार माध्यमांनी एकत्रपणे काम केल्यास प्रभावीपणे आपत्ती व्यवस्थापन करणे शक्य आहे, असे प्रतिपादन कर्नल (नि.) व्ही. एन. सुपणेकर यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित मंत्रालयातील मिनी थिएटर येथे ‘आपत्कालीन परिस्थितीत प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात श्री. सुपणेकर बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) शिवाजी मानकर यांच्यासह महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पत्रकार आदी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनात प्रसार माध्यमांचे खूप मोठे योगदान असल्याचे सांगत श्री. सुपणेकर आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, भुकंप, दुष्काळ, पूर, अवर्षण, दरड कोसळणे आदी आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांची अचूक माहिती व आपत्तीची सत्यस्थिती जनमाणसांपर्यंत पोहचविणे आणि याबाबत जागृकता निर्माण करण्यात प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी फक्त उपाययोजना करुन चालणार नाही तर त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे असून त्यासाठी सर्वस्तरावरील बदल आवश्यक आहे.
एखाद्या घटनेची पूर्व सूचना मिळाल्यानंतर येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांची माहिती लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे यासाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घेऊन जागरुकता निर्माण करावी. त्याबरोबरच आपत्तीजनक स्थितीत शासन आणि लोकांमधील संपर्क कायम ठेवण्यात प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका असते. अशा वेळी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांतील पत्रकारांना वृत्तांकन करताना त्या भागाची किंवा प्रदेशाची सर्वच क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे याची जाणीव पत्रकारांना असावी. आपल्या वृत्तांकनातून कोणाच्या भावना दुखावत तर नाही ना याची काळजी घेणे तसेच प्रसार माध्यमे ज्या बातम्या प्रसारित करतात त्याचे जनमाणसांवर कोणते परिणाम पडतात याची शहानिशा करणे आणि आपत्तीग्रस्तांना मदत पुरविण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी माध्यमांनी प्रयत्न केले पाहिजे.
पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शासनाकडून विविध योजना, प्रकल्प, उपक्रम राबविले जात आहेत त्यात काही प्रमाणात यश मिळत आहे. परंतु पूर्णपणे यश मिळविण्यासाठी लोकसहभागातून रेन वॉटर हार्वेस्टिंग पध्दतीचा वापर केल्यास दुष्काळासारख्या परिस्थितीवर मात करणे सहज शक्य आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग पध्दतीचा वापर करण्यासंबंधी प्रसार माध्यमांनी लोकांमध्ये जागृकता निर्माण करावी असेही श्री. सुपणेकर यांनी यावेळी सांगितले.
महासंचालक श्री. ओक म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका असते. सर्वांच्या सहकार्यातून आपत्तीजनक परिस्थितीवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनातील माध्यमांची भूमिका या विषयीचे श्री. सुपणेकर यांचे मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, सुत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती वर्षा आंधळे तसेच आभार उपसंचालक (वृत्त) ज्ञानेश्वर इगवे यांनी व्यक्त केले.