मुंबई, दि. 9 : पुणे जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या देवस्थानांना राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान केला आहे. यात श्री. म्हस्कोबा देवस्थान वीर (ता. पुरंदर), श्री. विठ्ठल देवस्थान डाळिंब (ता. दौंड), श्री. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळे (ता. जुन्नर) आदींचा समावेश असल्याचे जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
श्री. शिवतारे म्हणाले, गेले वर्षभर याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु होता. 11 ऑगस्ट 2016 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे सचिव असीम दासगुप्ता, उपसचिव प्रकाश वळवी, नियोजन विभागाचे अव्वर सचिव य. अ. पिंपळे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरातील 44 ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग प्रदान करण्यात आला. यात पुणे जिल्ह्यातील तीन देवस्थानांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या तीर्थक्षेत्रांना वार्षिक चार ते 10 लाखांपर्यंत भाविक भेट देतात ती क्षेत्रे ‘ब’ वर्ग दर्जास पात्र ठरतात. त्यांना प्रत्येकी 2 कोटी एवढ्या निधीच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येतो.
श्री. शिवतारे म्हणाले, तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देताना राज्य शासनाने काही अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचे तीनही देवस्थानांना कटाक्षाने पालन करावे लागेल. पशुहत्या व अंधश्रध्दा वाढीला देवस्थानांकडून प्रोत्साहन दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे आवश्यक आहे. असा प्रकार दिसून आल्यास निधी वितरीत केले जाणार नाही. अशी अट शासनाने घातल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून खालील स्वरुपाची कामे देवस्थानांना करता येणार आहेत.
- तीर्थक्षेत्रातील रस्त्याचे मजबुतीकरण – डांबरीकरण
- देवस्थानच्या रस्त्यावर पथदिवे
- मंदिर परिसरात संरक्षण भिंत
- पिण्याच्या पाण्यासाठी टाकी व नळपाणी पुरवठा
- स्वच्छतागृहे व स्थान गृहे
- भक्तनिवास
- परिसर सुशोभीकरणासाठी झाडे व पेव्हिंग ब्लॉक
- पार्किंग सुविधा

