स्थानिक भाजप नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांचे आयुक्तांना निवेदन
पुणे– चांदणीचौकातील नियोजित उड्डाणपुलासाठी बाधित फ्लॅटधारकांना मोबदला देण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने वर्गीकरणातून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक भाजप नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
चांदणीचौक येथील नियोजित उड्डाणपुलासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकसन मंत्री नितीन गडकरी यांनी 421 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन 27 ऑगस्ट रोजी झाले. मात्र अद्याप यासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन करण्यात आले नाही. मोकळ्या जागा संपादन करण्यापेक्षा बाधित होणारे 88 फ्लॅटधारक आणि एक बंगला मालक यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना रेडिरेकनरच्या दुप्पट मोबदला रोख स्वरूपात मिळावा; तसेच त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने वर्गीकरणातून उपलब्ध करून द्यावी अशी वेडे-पाटील यांची मागणी आहे.
या प्रकल्पाचा काही भाग बीडीपी आरक्षण झोनमध्ये येत आहे. तो विषय राज्यसरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे या विषयात निर्णय घेऊन बाधितांना योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळावा जेणेकरून हा प्रकल्प मार्गी लागेल असे वेडे-पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

