हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्यांच्याच चुकांमुळे 131 वर्षांची गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडित होण्याची वेळ -संभाजी पुलाला जोशी पुल पर्याय होऊच शकत नाही
पुणे- मेट्रोचे काम सुरु होऊन ७ वर्षे झाली गेल्या ५ वर्षात मुरलीधर मोहोळ हे दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्ष होते आणि ३ वर्षे महापौर आहेत . ५ वर्षात त्यांना समजले नाही कि संभाजी पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाते तेव्हाच त्यांनी या नियोजनाला का नाही आक्षेप घेतला .हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका मिरविताना तुम्ही ? भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. आज ज्येष्ठ नगरसेवक आणि कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल , विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ ,वसंत मोरे ,साईनाथ बाबर ,पृथ्वीराज सुतार आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली .
ते म्हणाले,'”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य माननीय महापौरांनी केले आहे. माननीय पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे माननीय महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

