भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

Date:

आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असून कित्येक कोट्यावधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती कळते.

भारतीय चित्रपट मुर्हूतमेढ

मुंबईच्या सँडहर्स्टरोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. दादासाहेबांसह अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पाहात होते. मात्र चित्रपट पाहतांना दादासाहेबांच्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पाहिला आणि याच ठिकाणी चित्रपट निर्मितीची ठिणगी पेटली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पर्वाची सुरूवात झाली.

मराठी माणूस एकदा मनात आले की, मग काहीही होवो मागे हटणार नाही.. वयाच्या ४० व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अभ्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. प्रख्यात नेत्र विशारद डॉ. प्रभाकर यांनी दादासाहेबांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. सावधानतेचा इशारा दिला पण त्याचीही पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेतले. त्यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. लंडन येथे त्यांची भेट बायोस्कोप सिने विकली या सिने साप्ताहिकाच्या संपादकांशी मि. केपबर्न  यांच्याशी झाली. त्यांना दादासाहेबांनी लंडन येथे येण्यामागील हेतू स्पष्ट केला. त्यावर यात पडू नका, इंग्लंडचे काही निर्मातेही अयशस्वी ठरले आहेत. शिवाय भारतात चित्रपटाची फिल्म ठेवण्यासाठी योग्य हवामान नाही असाही सल्ला केपबर्न यांनी दिला. त्यावर दादासाहेबांनी आपल्या अभ्यासाच्या आधारे प्रतिकूल मुद्दे खोडून अनुकूल मुद्दे मांडले व केपबर्न यांना प्रभावित केले. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले.

राजा हरिश्चंद्र : निर्मिती

राजा हरिश्चंद्र हा एक तासाचा चित्रपट तयार होण्यास आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका दादासाहेबांनी स्वत: केली तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलावंताने साकारली. राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र यांनी केली होती. कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला आणि भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरीत केला. त्या ठिकाणी मोहिनी भस्मासूर व सावित्री सत्यवान हे चित्रपट निर्माण केले. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच आणखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच चित्रपटांच्या प्रिंट काढणाऱ्या मशिनरीची त्यांना गरज भासू लागली. यासाठी १ ऑगस्ट १९१४ रोजी दादासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले. ४ ऑगस्टपासून दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे अडचणी वाढल्या फारसे पदरात न पडता दादासाहेबांना रिक्त हस्ताने परत यावे लागले.

विक्रमी कलाकृती

दादासाहेबांची चित्रपटनिर्मिती सुरूच होती. त्यांनी १९१७ मध्ये लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली. लंकादहनने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. मद्रास येथे या चित्रपटाच्या तिकीटविक्रीची जमा झालेली चिल्लर पोत्यात भरून बैलगाडीतून पोलीस बंदोबस्तात न्यावी लागली.

तद्नंतर त्यांनी How Films are made (१९१७), श्रीकृष्ण जन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९), भक्त प्रल्हाद (१९२०) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले. दरम्यान मूक चित्रपटांचा जमाना संपून बोलपटाचे युग सुरू झाले होते. १९३२ मध्ये बोलपटाचा जमाना आला. दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचे डबिंग करुन तो बोलपट बनवला. पुढे कोल्हापूर सिनेटोन कंपनीसाठी दादासाहेबांनी  १९३७ मध्ये गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला.  हाच चित्रपट दादासाहेबांचा शेवटचा चित्रपट ठरला.

चित्रपट कारकिर्द

फाळके यांनी ५२ मूकपट,  गंगावतरण  बोलपट, अनुबोधपटांबरोबर ३० लघुपटांची निर्मीती केली. ३ मे १९१३ रोजी मुंबई च्या कॉरनेशन चित्रपटगृहात  “राजा हरिश्चंद्र” चित्रपट प्रदर्शित झाला आणि दादासाहेबांचे नाव जागतिक पातळीवर “भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक” म्हणून नोंदविले गेले.

दादासाहेबांचा अंतिम काळ मात्र कष्टदायक गेला. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे फाळके युगाचा अस्त झाला. दादासाहेब फाळके यांचे स्मारक नाशिक येथे आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव येथे मोठ्या दिमाखाने उभी आहे. या ठिकाणी त्यांचा एक सुरेख पूर्णाकृती पुतळा देखील आहे. भारतीय पोस्ट विभागाने दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ तिकिट देखील काढले आहे.

फाळके पुरस्कार विजेते

दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन १९६९ पासून सुरू केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविका राणी ठरल्या. तर नुकताच अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रपटसृष्टीतील पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराब मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही.शांताराम, राज कपूर, एल.व्ही.प्रसाद, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ.राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, शिवाजी गणेशन, बी.आर.चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, बी.एन.सिरचार, पंकज मालिक, बी.एन.रेड्डी, धिरेंद्रनाथ गांगुली, काननदेवी, रायचंद बोराट, बी.नागी रेड्डी, आशा भोसले, जयराज, ए.नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही.के.मुर्ती, डी.रामा नायडू, के.बालचंदर, शशी कपूर व गीतकार गुलजार, सौमित्र चटर्जी, मनोज कुमार, प्राण, के. विश्वनाथ, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आदी विभूतींना हा पुरस्कार मिळाला आहे.

३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक).

– डॉ.राजू पाटोदकर, विभागीय संपर्क अधिकारी, मुंबई

(संदर्भ : महाराष्ट्राचे शिल्पकार दादासाहेब फाळके. लेखक बापू वाटवे)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...