नवी दिल्ली 10 मार्च 2022
भारतीय लष्कर आणि जपानचे जमिनीवरील स्वसंरक्षण दल यांचा सहभाग असलेल्या धर्म गार्डियन-2022 या 27 फेब्रुवारी 2022 पासून बेळगावच्या परदेशी प्रशिक्षण मैदानावर सुरु झालेल्या वार्षिक सराव कार्यक्रमाचा 12 दिवसांच्या यशस्वी संयुक्त लष्करी प्रशिक्षणानंतर आज 10 मार्च 2022 रोजी समारोप झाला. भारत आणि जपान या देशांमध्ये असलेल्या कालातीत मैत्री संबंधांना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये समन्वय आणण्यासाठी या लष्करी सरावाने अत्यंत अनोखी संधी प्राप्त करून दिली. या युद्ध सरावाने सहभागींना व्यावसायिक आणि सांस्कृतिक शिक्षणासाठी तसेच सामाजिक चर्चांसाठी मंच देखील उपलब्ध करून दिला आणि त्यातून हिंद-प्रशांत परिसरात एकीकृत सह-अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्ञान आणि सहकार्य यांच्या बाबतीतील त्यांची क्षितिजे रुंदावली.
या सरावादरम्यान परस्पर प्रशिक्षण आणि युध्द क्षेत्रावरील लढाईच्या वेळची परिस्थिती हाताळण्यापासून ते क्रीडा आणि सांस्कृतिक बाबींचे आदानप्रदान अशा विस्तृत कक्षेतील विषय हाती घेतल्यामुळे हा सराव अत्यंत यशस्वी ठरला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांनी गोळीबाराचा सराव आणि इतर युद्धविषयक कारवायांबाबतच्या विविध सादरीकरणामध्ये खांद्याला खांदा भिडवून भाग घेतला. दोन्ही बाजूंकडील पथकांनी दहशतवाद विरोधी कारवायांसारख्या समकालीन समस्यांविरुध्द वापरले जाणारे नैपुण्य एकमेकांशी सामायिक केले, एवढेच नव्हे तर त्यांनी ड्रोन आणि ड्रोनविरोधी शस्त्रांसारख्या विनाशक तंत्रज्ञानाचा वापर करताना आलेले अनुभव देखील सामायिक केले.
“धर्म गार्डियन” हा युध्द सराव भारतीय लष्कर आणि जपानचे जमिनीवरील स्वसंरक्षण दल यांच्यातील संरक्षण विषयक सहकार्याची पातळी वाढवेल तसेच यासारखे लाभ आणखी संघटीतपणे मिळविण्याच्या उद्देशाने आयोजित भविष्यातील अशा संयुक्त कार्यक्रमांसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.
RR45.jpeg)

