पंढरपूर : ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करते त्या त्या वेळी सरकार सत्तेचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचे काम करते, चंद्रकांत दादा यांनी आम्हाला धमकी देण्यापेक्षा स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी असा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबईतील भाजपाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या टिकेला प्रतिउत्तर देतांना धनंजय मुंडे म्हणाले की , आजच्या दिवशी स्थापना दिवस साजरा करण्यापेक्षा चार वर्षे जनतेची फसवणूक करणा-या ( फुल बनवणा-या ) भाजपाने आपला स्थापना दिवस ६ एप्रिल ला नाही तर १ एप्रिल या एप्रिल फुल दिवशी साजरा करायला हवा होता असा टोला लगावला. आज २८ -२८ रेल्वे द्वारे माणसे आणून भाजपा आता स्वतःचीच फसवणूक करत असल्याचे ते म्हणाले .
शिवसेनेने सत्तेचा लाभ घेऊन पुन्हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी विरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे या दूटप्पी भूमिकेला अजितदादा यांनी गांडूळासारखे दुतोंडी म्हटले तर बिघडले कुठे ? असा सवाल त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. हल्लाबोल यात्रेदरम्यान पंढरपूर येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.