नाशिक, दि. 18 : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकरी अभियंता योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे कार्य आदर्शवत आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग हा एक प्रकारे दिशादर्शकाची भूमिका बजावत असून यासोबतच उच्चशिक्षित तरूणांना या कार्यक्षेत्रात संधी दिल्यास त्यांच्या सहभागातून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्थेची उन्नतीच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सद्यस्थितीतील पाण्याचे महत्त्व व भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून संस्थेने सुयोग्य पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीवाटप केले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. परिणामी शेतकरी सधन होऊन संस्थाही आपोआपच समृद्ध होईल. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश्न, रस्तेबांधणी अशा सुधारणांकडे प्रभावीपणे लक्ष देवून लोकांच्या हिताचेच काम करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमात जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांच्यासमवेत उपस्थितांनी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या कै. भरतभाऊ कावळे यांना श्रद्धांजली वाहिली.

