मुंबई : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे न्यायालयाच्या निर्देशानुसार व विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सुची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु.मो.महाडिक, विधी व न्याय विभागाचे बु. झ.सय्यद, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा.को. धनावडे, उपसचिव टि.वा.करपते, वन विभागाचे अवर सचिव अ.म. शेट्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विष्णू पाटील आदीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी करून पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारित करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाहीही करण्यात यावी, असेही श्री. पटोले यांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव श्री. संजय कुमार यांनी विहित नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.