मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब, पीक विमा योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मान्यता, कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे सादरीकरण आदी निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
या मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षात होणे अपेक्षित आहे. यासाठी 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश देण्यात आले असून सर्व संरचनात्मक आराखड्यांचे 100 टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात याव्यात असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.