मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोहपुरूष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्याही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, राष्ट्रीय ऐक्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व असे आहे. पूर्णतः वास्तववादी विचारसरणीच्या सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य संग्रामात तसेच पुढे संस्थांनांच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. अखंड आणि बलशाली भारत हा सरदार पटेल यांचा ध्यास होता. त्याचसाठी त्यांनी आयुष्य वेचले. सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या अखंड भारताच्या प्रयत्नांना वंदन करण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसांच्याही सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

