Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने!

Date:

सहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट घडविण्यात बालकल्याण समितीला यश

अकोला-

मै रोया परदेस मे, भिगा मां का प्यार,

दुख ने दुखसे बात की बिन चिठ्ठी बिन तार

-निदा फाजली

आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशाच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यांनी. शासनाच्या  बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत या आईने फोडलेला हंबरडा…. उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. आपल्या लेकराला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला.

आईची माया ही गरीब, श्रीमंती तसेच कोणतीही भाषा, धर्म, प्रांत अशा कोणत्याही सीमा जाणत नाही. आई ही आई असते आणि तिचं लेकरु तिला सर्वात प्रिय असतं. अशीच ही आई…. दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव.  संसाराची कर्तीसवरती. नवरा विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजुरी करुन गुजराण.

दि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटुंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी दुष्ट व्यक्तीने अलगद उचलून नेलं. आईची झोप ती. लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्यासारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. आख्खं कुटुंब आकांत करु लागलं. नवरा, कच्ची बच्ची सगळी धाय मोकलून रडू लागली. प्रकरण पोलिसांत गेलं. शोध सुरु झाला.  आई आणि लेकराची ताटातूट त्यात खाण्यापिण्याचे वांदे, एका लेकराचा शोध घ्यावा तर दुसऱ्या कच्च्याबच्च्यांना काय खाऊ घालणार? हा यक्षप्रश्न.  मोलमजुरी केली नाही तर खाणार काय? पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार? आणि जो आता डोळ्याला दिसत नाही, तो सुमित.. त्याचं काय? कुठं असंल, कसा असेल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल…! ह्या आशेवर दिवसामागून दिवस काढत होती ती.  गावात जाऊन मोलमजुरी करायची. जमेल तसं अकोल्याला येऊन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवणं सुरु होतं. या आईची ही तडफड सुरु होती ती तब्बल दि.१६ मे पर्यंत.

सुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या  भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली.

जीव भांड्यात पडला खरा, पण लेकरु ताब्यात मिळत नाही  आणि त्याला प्रत्यक्ष बघत नाही तोवर ही आई कशी बरी स्वस्थ राहिल?  सुमितचा त्याच्या आई वडीलांचा फोटो व आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे, आणि न्यायालयाच्या  सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, कायदेशीर सोपस्कार करुन नागपूर आणि अकोला इथल्या बालकल्याण समितीच्या ऑनलाईन बैठका झाल्या.

तोवर ह्या माऊलीचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरुच होते. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या साथीमुळं  लॉकडाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित  मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूरहून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं.

गाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसुसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. बाप डोळे टिपत होता. तिला सावरु की पोराला बघू असं झालं होतं त्याला. सुमितची भावंडं त्यांना तर बिचाऱ्यांना काही कळतच नव्हतं… हा आनंद कसा व्यक्त करायचा? अखेर मायलेकराची भेट झाली. कित्ती कित्ती पापे घेतले तिनं त्याचे.  सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु  आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… त्याची भावंडे त्याला ओंजारु गोंजारु लागली, बाप कुरवाळू लागला. हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. हे दृष्य बघणाऱ्या उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते…. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती… तिचं लेकरू तिच्या कडेवर घेऊन जग जिंकल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.ही माय लेकरांची भेट घडविण्यात अनेक सहृद शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहयोग लाभला. त्यात  बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला  व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ. प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घाटे आणि  नागपूर बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी  ह्या सगळ्यांना त्या आईनं लाख लाख धन्यवाद दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...

पुण्याचे मोहोळ जबाबदार:विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या स्थितीवर नाम फौंडेशन आणि राष्ट्रवादीच्या सोनाली देशमुख आक्रमक

परभणी:डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी...

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलींडर स्फोट, 25 जणांचा मृत्यू

गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये...