मुंबई -वंदेभारत अभियानांतर्गत ५५ विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर ८४६५ प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या २४८८ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २९१८ आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ३०५९ आहे.
आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार,टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझिल, थायलंड,केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन,इथिओपिया, रोम या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
१ जुलै २०२० पर्यंत आणखी ५० विमानांमधून प्रवासी मुंबईत दाखल होतील.
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.
वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे.