मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली आहे. या वैभवात भर घालणारी मनोरा आमदार निवासाची इमारत उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
नवीन आमदार निवासाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास येथील जागेत आज झाले. त्यानंतर विधानभवनात झालेल्या समारंभात ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष विजय औटी, विधिमंडळातील प्रतोद राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे, वास्तुविशारद शशी प्रभू, यांच्यासह मंत्री, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक इतिहासाची साक्षीदार होती. अनेकांच्या चांगल्या-वाईट आठवणी याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु या आमदार निवासात वारंवार होणाऱ्या छोट्या अपघातामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. आवश्यक गोष्टींचा विचार करून नवीन इमारतीचा सुंदर आराखडा शशी प्रभू यांनी बनविला आहे. यामध्ये 800 पेक्षा जास्त रूम असणार आहेत. आमदार, माजी आमदार यांच्याबरोबर विधानमंडळ येथे येणाऱ्या शिष्टमंडळासाठीही व्यवस्था इथे होणार आहे. एनबीसीसीने कमीत कमी वेळेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही इमारत पूर्ण करावी. याबरोबरच मॅजेस्टिक आमदार निवासाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याकडेही लक्ष द्यावे.
मनोरा आमदार निवासातील आठवणी सांगून सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, नवीन आमदार निवासाची इमारत अतिशय चांगली होईल. या इमारतीची देखभाल ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच या माध्यमातून आमदारांना चांगली सेवा देता येईल. या इमारतीत आमदारांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही सोय व्हावी.
विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, मनोरा आमदार निवासाची सुसज्ज वास्तू उभी राहत आहे. आमदारांची सध्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी निवासव्यवस्था होत होती. या इमारतीमध्ये आता सर्वांची एकाच ठिकाणी व्यवस्था होईल.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविक केले. तर उपाध्यक्ष विजय औटी यांनी आभार मानले.
नव्या आमदार निवासाची रचना
एकूण 34 मजली टॉवर असणार
एकूण बांधकाम 7.72 लाख चौरस फूट
सभागृह आसन क्षमता 240
वाहनतळ, दवाखाना, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, छोटे थिएटर व उपहारगृहाचा समावेश
आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे कक्ष