नवी दिल्ली: केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
श्री. जावडेकर यांनी ही माहिती दिली असून या मंजुरीने आदिवासी व वन बांधवांना फायदा होईल तसेच पर्यावरणाचे रक्षण व विकास होणार असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील सोनवडे-घोडगे हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणाऱ्या घाट रस्त्याला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची दुसऱ्या टप्प्याची मंजुरी प्रलंबित होती, आजच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यासह अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या वनाच्छादित व आदिवासीबहुल भागातील चौराकुंड-खोपण-खोलमार रोड पासिंगच्या कामासह करंजखेडा-हातरू-राजपूर-सेमाडोह या 16 किलोमीटर रोड पासिंगला मंजुरी देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातून जाणाऱ्या या रस्त्यांचे काँक्रिटीकरण राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीअभावी अपूर्ण होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड-पुगलर ट्रान्समिशन लाईन आणि निमगाव लघु पाटबंधाऱ्याच्या कामालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.