मुंबई: मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठ्यामध्ये आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीपासून शहरात उपनगरामध्ये केलेली 10 टक्के पाणीकपात तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे.
मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये गेल्या वर्षी पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये 10 टक्के कपात केली होती. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही 15 टक्के कपात केली आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. पाणीकपात रद्द व्हावी, याविषयी नगरविकास राज्यमंत्री श्री. सागर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
श्री. सागर म्हणाले की, यंदा जून व जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे तलावातील उपयुक्त जलसाठा साधारणपणे 50 टक्क्यापर्यंत झाला आहे. अद्याप सप्टेंबरपर्यंत सुमारे 57 दिवस पावसाचे आहेत. या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात कपात केली होती. मुंबईतील विशेषतः उपनगरातील नागरिकांना या कपातीचा त्रास होत आहे. यंदाच्या पुरेशा साठ्यामुळे महानगरपालिकेने केलेली ही कपात तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा आणि उपनगरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.