मुंबई : भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मिती च्या प्रकल्प उभारणीसंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. लवकरच हे दोन्ही प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार असल्याची माहिती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. फुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, मकरधोकडा येथे जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी यासाठी सर्व सहकार्य करणार आहे. या प्रकल्पामुळे बायो इथेनॉल निर्मिती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. याशिवाय या परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
अशाच पद्धतीचे भारतात 12 प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 4 प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या प्रकल्पासाठी जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. 3.84 लाख टन तणस भंडारा जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यात 3.46 लाख टन तणस उपलब्ध आहे. हे सर्व जाळले जात असून आता त्यापासून इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक असे तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम उपलब्ध करून देणार आहे. सद्यस्थितीत भारतात एकूण पेट्रोल व डिझेलमध्ये मिश्रण करण्यास 1 टक्कासुद्धा इथेनॉल उपलब्ध नाही त्यामुळे अशा प्रकल्पाची देशाला गरज आहे अशी माहिती डॉ. फुके यांनी यावेळी दिली.
आदिवासी विकास विभागाची माहिती मिळण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देणे, वन परिक्षेत्रात राहणाऱ्यांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे, वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना करणे, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करणे अशी विविध कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती डॉ. फुके यांनी पत्रकार परिषदेत दिली.