पुणे-कोथरूड येथील मेट्रोच्या कामाची चाचणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे. त्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. याबाबत आज पुण्यात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलाही श्रेय वादाचा विषय नाही. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते आज सरकारमध्ये आहेत. ते निश्चितच त्यांच्या हस्ते होईल आणि दुसर्या कोणाच्या हस्ते होण्याचे कारण नाही. एवढ नक्की आहे की, जेव्हा हे काम पूर्ण होईल. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि त्याला ते नकार देखील देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी देखील दिला आहे. त्यामुळे पंतप्रधानाच्या हस्ते करुयात, सरकार येतात, जातात. त्यामुळे हा काही श्रेय वादाचा विषय नाही. मला आज एका गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो, त्यावेळी हा प्रकल्प रखडला होता. त्यामध्ये खूप वाद होते. त्या दरम्यान अनेक वेळा बैठका देखील घेतल्या. त्यानंतर काम सुरू झालं, याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करावे, तेवढे कमीच –
तसेच ते पुढे म्हणाले की, देशभरात मेट्रोच काम सुरू आहे. त्या तुलनेत पुण्यातील मेट्रोच काम गतीने केले आहे. त्याबद्दल महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. आतापर्यंत जवळपास ६० टक्के काम झाले आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवाजी नगर येथे मेट्रो हब होणार होतं, मात्र या सरकारने केवळ मेट्रोस्टेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्याबद्दल माहिती घेऊन बोलले. पण शिवाजीनगर हा आपला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तिथे मल्टी मॉडेल हब असणे, अत्यंत महत्वाचे आहे. मात्र त्याबद्दल नेमकी काही कारण असतील. त्यामुळे यावर काही कमेंट करणार नाही.
बिर्याणी आता शिळी झाला बाबा… –
पुण्यातील महिला पोलीस उपायुक्त यांनी मोफत बिर्याणी मागितली होती. त्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी गृहमंत्र्यांनी अहवाल सादर होईल असे सांगितले. मात्र तो अहवाल अद्याप आलेली नाही. त्यावर फडणवीस म्हणाले की, बिर्याणी आता शिळी झाला बाबा… असे म्हटले .
सरकारने पुण्यातील व्यापाऱ्याला आणि उद्योगाला दिलासा दिला पाहिजे –
पुण्यात निर्बंध कायम आहेत. त्यावर ते फडणवीस म्हणाले की, सरकारने काही नियम ठरवले आहेत. काही निकष ठरवले आहेत. त्यामध्ये ५ टक्कयांवर ज्यांचा दर असेल, त्यांच्यावर आपण निर्बंध ठेवत आहोत. पण आता महिनाभर पुण्याचा दर ५ टक्क्यांच्या आतमध्ये आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये व्यापारी, दुकानदार करोनामुळे खूप अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेवटी त्यांची देखील एक लिमिट असते. माल विकला गेला नाही. तर तो खराब होतो. नवीन माल घेण्यास पैसा नाही. या सर्व परिस्थितीमध्ये नागरिक निर्बंध मान्य करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. समजा ५ टक्क्यांपेक्षा जास्त असता, तर निर्बंध योग्यच होते. मात्र महिनाभर झालं, ५ टक्केपेक्षा दर खाली आहे. निर्बंध ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने पुण्यातील व्यापाऱ्याला आणि उद्योगाला दिलासा दिला पाहिजे. तसेच मदत केली गेली पाहिजे आणि त्यांच्यावरील निर्बंध कमी केले पाहिजे.
सगळच केंद्रावर टाकून कसं चालेल? –
लसीकरण वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र केंद्राकडून कमी लस उपलब्ध होत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, ओ हा फार जुना विषय आहे. केंद्राचा डायनॅमिक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आता देखील प्लॅटफॉर्म वर गेलात. तर राज्याला किती लसी आहेत आणि पुण्याला, नागपुरला किती लसी द्यायच्या, हे केंद्र ठरवित नाही. तर ते राज्य सरकार ठरविते. कालपर्यंत आपल्याकडे ४९ लाख लसी होत्या. त्यामुळे आता हे राज्याने ठरवायचे आहे. त्यामुळे सगळच केंद्रावर टाकून कसं चालेल?

