नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे अभिभाषण आणि विरोधकांना उत्तरे देताना शेतकऱ्यांचे नाव सुद्धा काढले नाही. असा आरोप करताना भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांसह सभात्याग केला. महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी विरोधी आहे. या सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदतीचे आश्वासन दिले होते. पण, त्यावर एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढलेला नाही. त्यामुळेच आम्ही सभात्याग केला असे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण काँग्रेस, राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी -फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाला दिलेले उत्तर हे एक मुख्यमंत्री म्हणून वाटत नव्हते. ते एखाद्या प्रचार सभेत किंवा शिवाजी पार्कवर बोलत असल्याचे वाटत होते. त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपने मांडलेल्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर देणे सोडा शेतकऱ्यांचे नाव सुद्धा घेतले नाही. त्यांचे हे भाषण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला खुश करण्यासाठी आणि सत्ता टिकण्यासाठी होते. अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.