पुणे, ता. ७ ः लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक वातावरण आणि निखळ आनंदाची निर्मिती करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) आगळ्या-वेगळ्या ऑनलाइन संगीत संध्येचे आयोजन केले होते.
दोन दिवस चाललेल्या या संगीत सभेचा शुभारंभ नांदीने आणि समारोप भैरवीने करण्यात आला. मनाचा उत्साह वाढवणार्या, हलक्या-फुलक्या आणि उडत्या चालीच्या गाण्यांचा समावेश होता. मराठी आणि हिंदी भाषेतील बालगीते, भावगीते आणि भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्याला जोड होती विषयानुरूप चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांची आणि वाद्य वादनाची. नैराश्य, ताणतणाव आणि भीतीचे मळभ दूर करीत उत्तरोत्तर ही संगीत मैफल रंगत गेली.
सोसायटीच्या विविध घटक संस्थांमधील ६५ हून अधिक शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. संगीत आणि चित्रकला शिक्षकांनी गेल्या महिन्यापासून तयारी करून घेतली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकार्यांना व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले. प्रत्येकाने या संधीचा मनसोक्त आनंद लुटला आणि आपल्या कलाविष्कारातून कलारसिकांना मंत्रमुग्ध केले. सळसळता उत्साह आणि आत्मविश्वास प्रदान करणार्या या कार्यक्रमाचा पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी आनंद लुटला.
या वेळी बोलताना सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले म्हणाले, ‘संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या कल्पनेतून सन २०१४ पासून संगीत संध्या कार्यक्रम सुरू केला. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम करता आला नाही. या वर्षी संकटावर मात करीत डीईएस परीवाराने एकत्र येत कार्यक्रम निर्मितीचे शिवधनुष्य सहज पेलले. चित्रपट, नाटक, संगीत, चित्रकला आदी माध्यमातून होणारे मनोरंजन आणि मिळणार्या निखळ आनंदाला आपण सर्व जण दीड वर्षांपासून मुकलो होतो. या कार्यक्रमामुळे सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल असा विश्वास वाटतो.’
सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे आणि प्रबंधक डॉ. सविता केळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रशांत जाधव, वरदा पटवर्धन, विकास दिग्रसकर, योगिनी कानडे यांनी निवेदन केले. डीईएस आयएफटीचे संचालक गिरीश केमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तांत्रिक सहाय्य केले. सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
सकारात्मकतेचा संदेश देणारी ‘डीईएस’ची ऑनलाइन संगीत संध्या
Date:

