आम्ही पुणेकर व साई सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने ‘नेत्रसेवा तपस्वी’ पुरस्कार प्रदान
पुणे : नेत्रदानासाठीची आव्हाने संपुष्टात आणायची असतील, तर नेत्रदानासाठी जनजागृती करण्यासोबतच संघटनांच्या माध्यमातून नेत्रदान सक्तीचे केले पाहिजे. अपघातात मृत घोषित केलेल्यांचे नेत्रदान आणि नेत्रदान केलेल्या कुटुंबीयांचा सन्मान, अशा अनेक प्राथमिक गोष्टी केल्यानंतरच नेत्रदानाची आव्हाने संपतील. महाराष्ट्र मात्र नेत्रदानाच्या चळवळीत अजूनही उदासीन असल्याचे हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडियाचे संचालक डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर व साई सामाजिक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रसेवा तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी शारदा विद्यापीठम् चे पं. वसंत गाडगीळ, आम्ही पुणेकरचे अध्यक्ष हेमंत जाधव, साई सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास काबरा, संजय लढ्ढा, हर्ष भूतडा, रमेश लाहोटी, सुरेश लावंदर, प्रणव पवार, संतोष फुटक आदी उपस्थित होते. यावेळी नेत्रदानासाठी समाजात काम करणारे डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. विश्वास डाके, डॉ. राजेश पवार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. मधुसूदन झंवर म्हणाले, आज देशात एक डोळा असणाऱ्यांची संख्या २० लाख आणि दोन्ही डोळे नसणाऱ्यांची संख्या ६ लाख इतकी आहे. दुदैर्वाने दररोज २० हजार रुग्णांची भर यामध्ये पडत आहे. सामाजिक परिस्थिती, अंतर आणि उपचारासाठी वेळेत न पोहोचल्यामुळे अनेकांना अंधत्वाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नेत्रदानासाठी उदासिनता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी देखील नेत्रदानासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि डॉक्टर यांना सरकारकडून अनुदान मिळाले पाहिजे. नेत्रदान केलेल्या कुटुंबियांची माहिती समाजासमोर आणून त्यांचा सन्मान झाला, तर इतरांना नेत्रदानासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. विश्वास डाके म्हणाले, आजही समाजात नेत्रदान केल्यानंतर होणाऱ्या परिणांमाचा मोठा गैरसमज आहे. त्याचबरोबर देशात नेत्रदानासाठीची यंत्रणा अत्यंत संथ आहे. त्यामुळे नेत्रदान करणाऱ्यांचा अभाव दिसून येतो. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतव्यक्तीने केलेल्या नेत्रदानाबद्दल कल्पना नसते, म्हणून अडथळे येतात. त्यामुळे तुम्ही नेत्रदानाचा अर्ज भरल्यानंतर त्याची कल्पना तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की द्यावी, असे ही त्यांनी सांगितले. डॉ. राजेश पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, अखिल झांजले यांनी प्रास्ताविक केले. सुभाष सुर्वे यांनी आभार मानले.

