पुणे- दक्षिण आणि पूर्व पुण्यातून महापौर आणि तदनुषंगिक पदे उपभोगलेली कित्येक वर्षे महापालिकेच्या कारभारात प्रतिनिधी राहिलेली तीच तीच मंडळी आता देण्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यासाठी नियोजन सुरु असल्याचे सूत्रांनी दिलेले वृत्त आहे. या युवा मंडळींना घेऊन राष्ट्रवादीचे एक जुने जाणते परंतु सध्या राजकारणात सक्रीय नसलेले नेते खुद्द ‘साहेबां’कडे जाणार असल्याचे समजते आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार मिळाल्याने यातील काही मंडळी भाजपाच्या वाटेवरही गेली होती मात्र त्यांना या संबधित जुन्या नेत्याने रोखले आहे आणि साहेबांची भेट घडवून आणतो नंतर तुम्ही तुमचा काय तो निर्णय घ्या असे सांगितल्याने युवा मंडळी थबकल्याचे दिसते आहे.
बदलणाऱ्या परिस्थितीत या युवा वर्गाकडून आता स्थानिक नेत्यांवर खाजगीत आरोप देखील होऊ लागले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पद उपभोगलेल्या मंडळींना आता थांबवा असे सांगण्यात येऊ लागले आहे. कुठवर यांना जनतेवर थोपविणार ? हीच मंडळी कुठे भाजपा आणि आर एस एस च्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी कसे संधान बांधून आहेत याचे फोटो हि आता दाखवू लागले आहेत. आपल्यापुढे कोणीही जाऊ नये यासाठी युवा मंडळीना हे तथाकथित नेते बरोबर सुद्धा ठेवीत नसल्याचे सांगण्यात येते .कात्रज,धनकवडी,हडपसर भागातून यांना बदलले नाही तर भाजपा मध्ये जाण्याची तयारी अनेकांनी केलेली दिसते आहे. या अनुषंगाने काहींनी भाजपचे फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे गणेश बिडकर यांच्या भेटी गाठी घेतल्याचेही वृत्त आहे.