पुणे-शिरूर येथील सोन्या-चांदीच्या प्रसिद्ध व्यापाऱ्याला, डी. के. ग्रुप च्या नावाने तब्बल एक कोटी रूपयांची खंडणी मागण्याचा आणि ती न दिल्यास कुटूंबियांसह गेम वाजविण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरातील सराफी पेढीत खळबळ उडाली आहे. हा डी. के. ग्रुप कुणाचा आणि खंडणीसाठी धमकी देणारा कोण, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी पोलिस दलाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी. या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास करतानाच गुन्हेगारांचा शोध लावावा व त्यांची पाळेमुळे खणून काढावीतअशी मागणी केली आहे शिरूर सारख्या ग्रामीण भागात सचोटीने सराफी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला एक कोटी रूपयांची खंडणी मागण्याचा प्रकार गंभीर व धक्कादायक आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांबरोबरच इतर व्यापारी बांधवांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील व्यापारी शिस्त व व्यावसायिक संस्कृतीसमोर भितीची छाया असताना आता त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस तत्परतेने संबधित गुन्हेगारांचा छडा लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी कि,’दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. याबाबत संबंधित ज्वेलर्सने शिरूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरात मुख्य बाजारपेठेत संबंधित व्यापाऱ्याचे सोन्या – चांदीच्या दागिण्यांचे दुकान असून, ही सराफी पेढी कायमच ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असते. सोमवारी या पेढीच्या ४६ वर्षीय मालकाला त्यांच्या मोबाईलवर ९७६८०८००८० या क्रमांकावरून प्रथम एक कोटी रूपये खंडणीच्या मागणीचा मेसेज आला. त्यांनी दूर्लक्ष केल्यानंतर काही वेळाने समोरील व्यक्तीने थेट मोबाईलवर संपर्क साधून, मी डी. के. ग्रुपमधून बोलतोय. एक कोटी रूपयांची खंडणी दे नाहीतर तुझ्या कुटूंबाचा गेम वाजवणार, तुला जीवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली.या प्रकारानंतर घाबरलेल्या सराफाने आपल्या कुटूंबियांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. मोबाईलवर संपर्क साधलेल्या व्यक्तीने एक कोटी रूपयांची मागणी करताना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद त्यांनी दिली. डी. के. ग्रुपचे नाव सांगत अज्ञाताने स्वतःसाठी, स्वतःच्या गॅंगसाठी व स्वतःच्या वर्चस्वासाठी मला व कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रूपये मागितले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस दलाला तपासाच्या सूचना दिल्याचे समजते. ज्या मोबाईल क्रमांकावरून धमकी देण्यात आली त्याचा तपास केला असता, तो मोबाईल वारीतील एका व्यक्तीचा असल्याचे व तो चोरीला गेलेला असल्याने त्याबाबतची तक्रारही दाखल झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे तब्बल एक कोटी रूपयांची खंडणी मागणारांचा शोध घेण्याचे व त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

