नवी दिल्ली- दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED)अटक केली आहे. त्यांची भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगप्रकरणी गत काही दिवसांपासून चौकशी सुरू होती. हे प्रकरण कोलकाताच्या एका कंपनीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
सत्येंद्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आहेत. 2 महिन्यांपूर्वीच PMLA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर जैन यांचे कुटुंबिय व फर्मशी संबंधित 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. सीबीआयने ऑगस्ट 2017 मध्ये हे प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर ते ED कडे वर्ग करण्यात आले होते.
शेल कंपन्यांकडून 4.81 कोटी मिळाले
ED च्या माहितीनुसार, 2015-16 मध्ये सत्येंद्र जैन एक लोकसेवक होते. त्यांच्या मालकीच्या व नियंत्रणातील कंपन्यांना कोलकाता स्थित एंट्री ऑपरेटर्सकडून रोख हस्तांतरणाच्या मोबदल्यात शेल कंपन्यांचे 4.81 कोटी रुपये हवालामार्फत प्राप्त झाले होते. नंतर या रकमेचा वापर दिल्ली परिसरात शेत जमीन खरेदी व कर्ज फेडण्यासाठी करण्यात आला होता.
डॉ. ऋषी राज यांच्यावरील धाडीत नाव आले उजेडात
सीबीआयने दिल्ली दंत समुपदेशनाचे रजिस्ट्रार डॉ. ऋषी राज यांच्या घरी टाकलेल्या धाडीत सत्येंद्र जैन व त्यांच्या कंपन्यांशी संबंधित दस्तावेज व 2 कोटी रुपयांच्या बँक डिपोझिटच्या स्लिप आढळल्या होत्या. त्यामुळे 2011 मध्ये जैन यांच्या कंपन्यांच्या नावावर 2 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याचे उघड झाले होते. याशिवाय जैन यांच्या नावे दिल्लीच्या कराला गावात 12 व 8 बिघा जमिनीच्या रजिस्ट्रीसह 14 बिघा जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नीही असल्याचे दस्तावेज यावेळी सापडले होते.

