नवी दिल्ली, 17 मार्च 2022
सागरी गस्ती जहाजांच्या (OPVs) मालिकेतील 105 मीटर लांबीचे पाचवे भारतीय तटरक्षक दलाचे जहाज (ICGS) ‘सक्षम’ याचे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी 16 मार्च 2022 रोजी गोवा शिपयार्ड येथे जलावतरण केले. तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही.एस. पठानिया आणि केंद्र आणि राज्य सरकारचे इतर वरिष्ठ मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘सक्षम’, म्हणजे ‘समर्थ’, हे राष्ट्राच्या सागरी हितासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या इच्छाशक्तीचे प्रकटीकरण आणि ‘यत्र, तत्र, सर्वत्र’ या उक्तीची वचनबद्धता आहे.
105-मीटर लांबीचे सागरी गस्ती जहाजाचे स्वदेशी तंत्रज्ञानाने डिझाईन आणि बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेडने केली आहे आणि त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेव्हिगेशन आणि दूरसंवाद उपकरणे, सेन्सर्स आणि यंत्रसामुग्री आहे. दोन -इंजिन असलेले हेलिकॉप्टर आणि चार अति वेगवान बोटी वाहून नेण्यासाठी या जहाजाची रचना करण्यात आली असून त्यात चढण्यासाठी, शोध आणि बचावासाठी, कायद्याची अंमलबजावणी आणि सागरी गस्त यासाठी दोन फुगवल्या जाणाऱ्या बोटींचा समावेश आहे. समुद्रात तेल गळती रोखण्यासाठी मर्यादित प्रदूषण प्रतिसाद उपकरणे वाहून नेण्यासही हे जहाज सक्षम आहे.
तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होणारे जहाज कोची येथे तैनात असेल. सध्या, भारतीय तटरक्षक दलात जहाजे आणि विमानांचा विस्तार होत आहे. तसेच, विविध भारतीय शिपयार्ड्समध्ये असंख्य जहाजे बांधणीच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि बेंगळुरूच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ॲडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू आहे जे सतत गतिमान सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या गस्त घालण्याच्या क्षमतेला अधिक सामर्थ्य प्रदान करेल. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज सक्षम चे नेतृत्व उपमहानिरीक्षक पी राजेश यांच्याकडे आहे आणि 10 अधिकारी आणि 95 खलाशी जहाजावर तैनात आहेत.
भारतीय तटरक्षक दलाचे जहाज सक्षम कार्यान्वित झाल्यामुळे बहुविध सागरी कार्ये पार पाडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची कार्यान्वयन क्षमता वाढली आहे. या जहाजाच्या समावेशामुळे आपल्या विशाल पश्चिम सागरी किनारपट्टीच्या संरक्षणात भर पडेल.


