पुणे- कलावंतांना तातडीने लस मिळावी त्यांचे दोन्ही डोस पूर्ण व्हावेत म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी आज महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
या वेळी धुमाळ म्हणाल्या ,’ पुणे शहर सांस्कृतिक माहेरघर आहे. या पुणे शहरातील कलेच्या विविध घटकातील कलाकार आज कोरोनाच्या महामारीमुळे हतबल झाले आहे. नाटयगृह व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलेवरती पोट असणा या कलाकारांना उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर कलाकारांचे महानगरपालिकेच्या माध्यमातुन कोविड लसीकरण झाल्यास त्यांना कार्यक्रम करणे सोयिस्कर होईल व त्या अनुषंगाने नाट्यगृह लवकरात लवकर खुली होतील व त्यांना बाहेरच्या कार्यक्रमास बोलवले जाईल त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल व त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. या विषयाला अनुसरुन कलाकारांचे श्रध्दास्थान असलेले पुणे महानगरपालिकेचे बालगंधर्व रंगमंदीर लसीकरणा करीता योग्य ठिकाण ठरेल,तरी पुणे शहरामधील कलाकारांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तातडीने चालु करण्यात यावे. अभिनेते विजय पटवर्धन , राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील , मा नगरसेवक बाबा धुमाळ,अभिनेते राजू बावडेकर , अभिनेते योगेश सुपेकर , प्रसाद कुलकर्णी , गणेश गायकवाड यावेळी उपस्थित होते

