पुणे – सध्या वाढत चाललेला (म्यूकोर मायकोसिस) ब्लॅक फंगस आजार महामारी म्हणून घोषित करावा आणि या आजारावरील औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने वेगळी कार्यप्रणाली करावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल (शुक्रवारी) केली.
कोविड -१९ या साथीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत साथ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने आमदार शिरोळे यांनी विविध मुद्दे मांडले.
पुण्यातील १८ वर्षांवरील जे विद्यार्थी परदेशात शिकायला जाणार आहेत अशांची संख्या खूप असल्याने त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी विशेष बाब म्हणून तरतूद करण्यात यावी. त्यामुळे त्यांना परदेशात जाणे सोयीचे होईल. तसेच हृदय विकार तज्ञ श्री जगदीश हिरेमठ यांनी सुचविल्या प्रमाणे, १८वर्षावरील फक्त नोंदणीकृत व्यक्तीलाच लस देण्यात यावी त्यासाठी संगणकीय लॉटरी पद्धतीने वेळ देण्यात यावी. त्यामुळे, लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळली जाईल. तसेच, दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तींची वेगळी यादी करावी, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी बैठकीत केल्या.

