पुणे, दि. ३० मे ः विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेतर्फे बुधवार, दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी १२.१५ वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह, एमआयटी, कोथरूड, पुणे येथे विवादित मंदिर-मशीद वादावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लीम बुद्धीजीवी लोकांची बैठक विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विश्वशांती केंद्राचे सल्लागार आणि माजी कुलगुरू प्रा. डॉ. एस. एन. पठाण यांनी दिली.
‘ज्ञानवापी मशीद’ आणि काशी विश्वेश्वर मंदिर प्रकरण, मथुरेचा मंदिर-मशीद विवाद आणि अलीकडे ताजमहाल व कुतुब मिनार या वास्तूंवरून हिंदू आणि मुस्लिमांच्यामध्ये कृत्रिम तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न दोन्ही धर्मातील विविध संघटनांकडून सतत होत आहेत असे दिसून येतेे. यामध्ये कधी कधी तथाकथित राजकीय नेते अघाडीवर दिसतात व आपल्या भाषणाने समाजामध्ये हिंदू-मुस्लीम ह्यांच्यात जातीय सलोखा निर्माण करण्याऐवजी द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत असे दिसते. यामुळे ग्रामीण भागात दूरवर असलेल्या हिंदू आणि मुस्लीम बांधवांच्या मध्ये गैरसमज वाढत असून त्यातून अफवा पसरत जातात. वास्तविक ग्रामीण भागात विशेषतः महाराष्ट्रात हिंदु-मुस्लीम धर्मीयांचे संबंध नेहमीच अत्यंत स्नेहपूर्ण राहिलेले आहेत. भारत देश म्हणजे जगातील जवळ जवळ सर्वच महत्त्वपूर्ण धर्माचे सुदृढ आश्रयस्थान राहिलेला आहे. गेली शेकडो वर्षे या देशात हिंदू धर्माबरोबर मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आणि नवबौद्ध गुण्यागोविंदाने एकत्र राहात आहेत. या देशात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात व ‘विविधतेतून एकता’ हीच भारत या देशाची जगाला ओळख आहे.
ज्या मशीदीमध्ये हिंदु किंवा अन्य धर्मीयांच्या धर्मस्थळाचे अवशेष असतील तर त्या जागेला विवादास्पद म्हणावे लागेल आणि अशा विवादास्पद जागेवर मुस्लीम बांधवांची प्रार्थना ईश्वरालाच मंजूर होत नाही अशी इस्लाममध्ये धारणा आहे. तर मुद्दामून मशिदीला विरोध करून दोन्ही धर्मीयांचे ध्रुवीकरण केले जात आहे व त्याला काही समाजविरोधी ताकदी खतपाणी घालत आहेत असे मुस्लीम बांधवांचे मत आहे. अर्थात सदर विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर अधिक बोलणे उचित नाही.
विश्वशांती केंद्र (आळंदी) तर्फे नेहमीच समाजातील संघर्ष मिटवण्यासाठी शांततामय तोडगा सुचविण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारची बैठक घेऊन केंद्र सरकारला श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीबाबतीत मा. न्यायमूर्ती खलीफुल्ला समितीला २०१९ मध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली विश्वशांती शिष्टमंडळाने काही सूचना केल्या होत्या. त्याचे फलस्वरूप की काय, पण अयोध्येत एका मोकळ्या भूखंडावर ५ एकर जागा मुस्लीम बांधवांना मशीदीसाठी देण्याचा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता.
या बैठकीसाठी मुस्लीम बुद्धिजीवी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे तर्फे करण्यात आले आहे. आपल्या उपस्थितीबद्दलची सूचना wpcyouthmission9@gmail.com यावर मेल करावी किंवा सचिव, युथ मिशन, भ्रमणध्वनी क्रमांक +९१ ९९२३६९४५९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
विवादित मंदिर-मशीद वादावर महाचर्चा १ जून रोजी
Date:

