गुरुग्राम-उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला.उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली.
मुलायमसिंह यादव दोन वर्षांपासून आजारी होते. त्रास वाढल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी त्यांनाही कोरोना देखील झाला होता. ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत, जेव्हा त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या होत्या.
- 26 सप्टेंबर 2022 रोजी मुलायम सिंह यादव शेवटच्या तपासणीसाठी मेदांता गुरुग्रामला पोहोचले. तेव्हापासून ते शेवटपर्यंत तेथे दाखल होते.
- 5 सप्टेंबर 2022 रोजी मुलायम सिंह यांनाही मेदांता येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
- 13 ऑगस्ट 2022 रोजी मुलायम सिंह यादव यांनाही मेदांता येथे दाखल करण्यात आले.
- 24 जून 2022 रोजी मुलायम सिंह यादव नियमित तपासणीसाठी मेदांता येथे गेले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना २ दिवस दाखल करण्यात आले होते.
- 15 जून 2022 रोजी मुलायम यांनाही मेदांता येथे दाखल करण्यात आले. चौकशीअंती त्यांना त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
- 1 जुलै 2021 रोजी मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- ऑक्टोबर 2020 मध्ये, मुलायम देखील कोरोना पॉझिटिव्ह आले, तरीही त्यांना लस मिळाली होती.
- ऑगस्ट 2020 पोटदुखीमुळे त्यांना मेदांता येथे दाखल करण्यात आले. चाचणीत किडनी इन्फेक्शन आढळून आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली
देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहीली आहे. पक्षाची स्थापना, संघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख मिळवली. त्यांचे देशाच्या समाजकारण, राजकारणाच्या वाटचालीतील योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

