दुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी

Date:

द सायलेंट फॉरेस्ट चित्रपटासाठी तैवानचे  दिग्दर्शक चेन-निएन को यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार तर  त्झू-चुआन लिऊ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

आय नेव्हर क्राय मधील भूमिकेसाठी पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

आशयघन आणि सौंदर्यप्रधान चित्रपटांच्या निवडीबद्दल इफ्फीचे आभार: ज्युरी अध्यक्ष पाब्लो सीझर

इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या डॅनिश  मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते या कथानकावर आधारित चित्रपट  इन टू द डार्कनेस/ De forbandede år  या चित्रपटाने आज समारोप  झालेल्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. अँडर्स रेफन दिग्दर्शित, 152 मिनिटांच्या  या  डॅनिश चित्रपटाने नाझींच्या कब्जात देश असताना डेन्मार्कच्या जनतेला भोगाव्या लागलेल्या भावनिक समस्यांची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे. नायक कार्लस्कोव्हला सामना करावा लागणाऱ्या मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. एकीकडे, त्याला त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जर्मन बाजारपेठेचे उत्पादन चालू ठेवण्यास आक्रमकांद्वारे भाग पाडले जात आहे तर दुसरीकडे, या निवडीच्या नैतिक अनिश्चिततेमुळे त्याच्या कुटुंबालाही यातना सोसाव्या लागत आहेत.40 लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार दिग्दर्शक अँडर्स रेफन आणि निर्माता लेने बोरग्लम यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला आहे. तसेच दोघांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.

तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या  चेन-नियन को यांना त्यांच्या 2020 च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट द साइलेंट फॉरेस्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी प्रदर्शन या चित्रपटातून करण्यात आले आहे.

कर्णबधिरांच्या जगातील वास्तविक घटनांवर आधारित 108 मिनिटांच्या या चित्रपटात नुकत्याच एका विशेष शाळेत दाखल केलेल्या चांग चेंग या कर्णबधिराच्या नजरेतून हे कथानक मांडण्यात आले आहे. पीडितांना  सावज बनवून  त्यांचा कसा बळी जातो याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रक्क्म  यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय म्हणजे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने 17 वर्षीय तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. त्याने  चांग चेंग या प्रमुख भूमिकेतून दिव्यांग मुलाचे भावविश्व समर्थपणे उलगडून दाखविले. लियू हा 76 हॉरर बुक स्टोअर (2020) आणि ऑन चिल्ड्रेन (2018) मधील भूमिकांसाठी देखील ओळखला जातो. प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या साठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ”आय नेव्हर क्राय” या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे ज्यात तिने परदेशातील नोकरशाहीच्या चक्रव्यूहातून स्वतःच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेताना स्वतःची वाट चोखाळत करावा  लागणारा  संघर्ष चपखलपणे मांडला आहे. स्टॅफिएजला पुरस्कार स्वरूपात 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळाले. स्टॅफिएज ही    स्प्रावा टोमका कोमेन्डी (2020) , 25 लाटनीव्हिनोस्की आणि मार्सेल (2019) या चित्रपटांसाठी देखील ओळखली  जाते.इफ्फी 51 चा विशेष ज्युरी पुरस्कार बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या सन  2020  मधील  ”फेब्रुवारी”  चित्रपटासाठी देण्यात आला आहे. या चित्रपटात आठ, अठरा आणि ब्याऐशी या तीन वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची  जीवनकथा सांगण्यात आली आहे. आयुष्य म्हणजे विविध अवतारातील सातत्य असून माणसं  म्हणजे केवळ विस्तीर्ण आकाशाच्या खाली असलेल्या या विस्तीर्ण मोकळ्या धरतीवरील ठिपके आहेत हा जीवनाचा दृष्टिकोन काव्यमय रूपकातून सादर करण्यात आला आहे. दिग्दर्शक कामिन कालेव एक लेखक देखील आहेत आणि ईस्टर्न प्लेज (2009) आणि फेस डाउन (2015) साठीसुद्धा  ते ओळखले जातात.दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.इफ्फी 51 चा विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ” ब्रिज ”साठी प्रदान करण्यात आला आहे ज्यात ग्रामीण आसाममध्ये दरवर्षी येणाऱ्या  पुरात सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे शक्तिशाली ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे दरवर्षी  येणारा पूर आणि शेतीचे नुकसान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कलिता यांना पुरस्काराच्या रूपात प्रमाणपत्र मिळाले.

सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक  पदार्पण हा  पुरस्कार ब्राझीलचे  दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना 2020 मधील  पोर्तुगिज  चित्रपट ” व्हॅलेंटिना ”’ यासाठी  देण्यात आला आहे. सतरा वर्षांच्या ब्राझीलियन समलिंगी मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे .  तिच्या आईबरोबर सामान्य जीवन व्यतीत करणे हा तिचा एकमेव उद्देश आहे.

दिग्दर्शक सॅंटोस यांनी ब्राझीलमधील  विद्यापीठातून  सिनेमाचा अभ्यास केला, जिथे त्यांनी  अनेक चित्रपट आणि माहितीपट दिग्दर्शित केले. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांचे चित्रपट निवडले गेले आहेत. त्यांना 50 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

शांतता, सहिष्णुता आणि अहिंसा  हे  महात्मा गांधींचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटासाठी असलेला विशेष  आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार हा अमीन नायफेह यांच्या 2020 मधील  ” 200 मीटर ”  या अरेबियन चित्रपटाला मिळाला आहे ज्यात मध्यपूर्वेतीलइस्रायलच्या ताब्यात  असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या पॅलेस्टाईन वडिलांची कथा आहे जे दुभाजक भिंतीच्या एका बाजूला आहेत तर त्यांचा मुलगा पलीकडच्या बाजूला रुग्णालयात आहे आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिसच्या सहकार्याने इफ्फीच्या सहभागाचा भाग म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.

इफ्फी 51  अर्थात 51 व्य  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध श्रेणीतील  पुरस्कारांचा निर्णय  हा अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर यांच्या अध्यक्षतेखाली जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांचा समावेश असलेल्या  ज्युरी  मंडळाने घेतला आहे. प्रसन्ना विथानाज (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसेन (बांगलादेश) हे ज्युरीमंडळाचे  अन्य सदस्य होते.

एका व्हिडिओ संदेशामध्ये ज्युरी अध्यक्ष पाब्लो सीझर यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रकारातील चित्रपटांचे मूल्यांकन करण्यासाठी ज्यूरीना दिलेल्या संधीबद्दल महोत्सवाचे आभार मानले. “महोत्सवासाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये, विस्तृत आणि विविध संकल्पना मांडल्या गेल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य, मुलांचे आणि या जगातील सर्व लोकांचे अधिकार आणि स्त्रियांचे सबलीकरण आणि काही लोकांनी सादर केलेल्या गोष्टींच्या स्मृती आम्हाला विशेष भावल्या. आशयघन आणि सौंदर्यप्रधान चित्रपटांच्या निवडीबद्दल इफ्फीचे आभार.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...