पुणे : अरबी समुद्रात अतितीव्र स्थितीत आलेलं तौक्ती चक्रीवादळ सध्या महाराष्ट्र किनारपट्टी समांतर प्रवास करत आहे. हे चक्रीवादळ वायव्य दिशेने प्रवास करत असून आज दुपारी 3 ते सायंकाळी 6 च्या सुमारास गुजरात किनारपट्टीला धडकण्याची अंदाज हवामान विभागाने दिला. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलाच्या वतीने एनडीआरएफच्या तुकड्यांना तसेच इतर संसाधनांना मालवाहू विमानाच्या माध्यमातून अहमदाबाद पाठविण्यात आले आहे.
रविवारी (ता. 16) पुण्यातून दोन सी-130 जे या मालवाहू विमानांच्या माध्यमातून 110 एनडीआरएफचे जवान व 15 टन साधन सामग्री अहमदाबादला पाठविण्यात आले. त्याचबरोबर कोलकत्ता येथून दोन सी-130 जे आणि एक एएन 32 या मालवाहू विमानातून 167 एनडीआरएफ जवान व 16.5 टन वजनाचे संसाधने तर, विजयवाडा येथून दोन एएन 32 आणि सी-130जे विमानांच्या माध्यमातून 121 एनडीआरएफचे जवान अहमदाबादला पाठविण्यात आले.

18 मे पर्यंत हे वादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याकडे सरकेल असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र स्वरुपाचे झाले असून गुजरातच्या दिशेने ते सरकत आहे. सध्या ते मुंबईला खेटून पुढे सरकत आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारण 150 किमी अंतरावरून या वादळाचा प्रवास सुरू आहे.

