आठ जणांना सायबर क्राईम सेलकडून अटक
पुणे– बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गेन बिटकॉईन कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक करणा-या आठ जणांना सायबर क्राईम सेलकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एक बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा 0.1 टक्के बिटकॉईन असे 18 महिन्यात एका बिटकॉईनचे 1.8 बिटकॉईन असा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते.
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील आकाश कांतीलाल संचेती (रा.मुकुंद नगर, पुणे) आणि काजल जितेंद्र शिंगवी (वय-25, रा.महर्षीनगर, पुणे) आणि व्यास नरहरी सापा (वय-46, रा.भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली. निगडी पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील हेमंत विश्वास सूर्यवंशी (रा.बाणेर, पुणे), हेमंत बाबासाहेब चव्हाण (रा.हडपसर, पुणे), अजय तानाजी जाधव (रा.काळेवाडी, फाटा), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (रा.नवी दिल्ली) आणि हेमंत चंद्रकांत भोपे (वय-रा.डिएसके विश्व, धायरी) यांना अटक करण्यात आली.
दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार घेऊन अनेकांना गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत आणि त्यांची फसवणूक करत होते. तर आरोपी पंकज आदलाखा हा मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून कार्यरत आहे. त्याने पुणे, मुंबई दिल्लीसह भारतातीतल अनेकत शहरात आणि दुबई येथे गेन बिटकॉईनच्या प्रचारार्थ सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आरोपींनी यामार्फत स्वत:चा लाखो रुपयांचा फायदा करून घेतला आणि गुंतवणूकदारांना स्वत: तयार केलेले क्रिप्टो एमकॅप मार्फत परतावा दिल्याचे भासवून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली.
आतापर्यंत फसवणूक झालेल्या पुण्यातील 25 नागरिकांनी सायबर सेल येथे तक्रार दिली आहे. तर फसवणुकीचा आकडा 2.25 कोटी रुपयांपर्यत पोहोचला आहे. ज्या नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक झाली त्यांनी सायबर क्राईम सेल गुन्हे शाखा, पुणे शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.