सीएसआयआरच्या एनबीआरआय आणि सीआयएमएपी द्वारा संयुक्तपणे औषधाची निर्मिती
- औषधाच्या प्रभावीपणा व सुरक्षिततेची शास्त्रीय दृष्ट्या यशस्वी चाचणी
- फक्त पाच रुपयांत उपलब्ध होणार औषध
पुणे : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणा-या काउंसिल ऑफ सायंटिफीक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च विभाग (सीएसआयआर- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) यांच्या वतीने पहिल्या डीपीपी ४ निरोधी उपक्रमा सोबत मधुमेहावरील ‘बीजीआर – ३४’ अर्थात ब्लड ग्युकोज रेग्युलेटर या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. मधुमेहाच्या टाईप २ साठी या औषधाची निर्मिती करण्यात आली असून औषधाचा प्रभावीपणा व सुरक्षितता यांची शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून हे आता रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सीएसआयआर-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्युटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
लखनऊ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्युट,सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मेडीसिनल अॅण्ड अरोमटिक प्लँटस् यांच्या संयुक्त विद्यमानाने या औषधाची निर्मिती करण्यात आली असून डीपीपी ४ निरोधींच्या तुलनेत‘बीजीआर – ३४’ ची किंमत ही रुपये पाच इतकी असणार आहे,जी जगभरातील मधुमेहाच्या औषधांपेक्षा नाममात्र आहे,असेही ते यावेळी म्हणाले.
सीएसआयआर- सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मेडीसिनल अॅण्ड अॅरोमटिक प्लँटस् (सीआयएमएपी)चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी, सीएसआयआर- नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्युटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजीव कुमार ओझा, डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या उपप्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी आणि एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया लि.चे संचालक एस. पी. श्रीवास्तव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. रावत म्हणाले, “आज भारतात मधुमेह असणा-या रुग्णांचे प्रमाण मोठे आहेत. तब्बल ६ कोटी २० लाख नागरिक आज या आजाराने त्रस्त आहेत. मात्र यावर कोणताही गुणकारी उपाय सापडलेला नाही. त्यामुळे ‘बीजीआर – ३४’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. या औषधाची उपयुक्तता ही शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित करण्यात आली असून औषधाच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांना ताबडतोब आणि दीर्घ काळ लाभ मिळेल असा आमचा विश्वास आहे.”
मधुमेहावर सध्या उपलब्ध असलेल्या औषधांचे अनेक अनिष्ट परिणाम रुग्ण भोगत असतात. हे परिणाम अनेक अंशी रुग्णांच्या आरोग्याला घातक,अपायकारकही ठरतात. मात्र ‘बीजीआर – ३४’ या आयुर्वेदिक औषधाने रक्तातील साखर तर नियंत्रित होईलच याशिवाय शरीरावर इतर औषधांचे होणारे दुष्यपरिणाम या औषधाच्या वापराने मर्यादित होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मधुमेहावरील तज्ज्ञ आणि डॉक्टर आपल्या रुग्णांना हे औषध नक्की सुचवतील असा विश्वासही यावेळी डॉ. रावत यांनी व्यक्त केला.
नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्युट आणि सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मेडीसिनल अॅण्ड अॅरोमटिक प्लँटस् यांनी एकत्रितपणे रुग्णांच्या गरजा ओळखत या टाईप २ मधुमेहावरील औषधाची निर्मिती केली आहे. यासाठी या दोन्ही संस्थांच्या शास्त्रज्ञांनी आपल्या आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या ५०० हून अधिक प्राचीन जडीबुटींवर संशोधन केले, ज्यापैकी सूचीबद्ध ६ सर्वोत्कृष्ट वनस्पतींची निवड करण्यात करत त्यांच्यापासून ‘बीजीआर – ३४’ या औषधाची निर्मिती करण्यात आली.
यामध्ये दारुहळद (बेर्बेरीस अरिस्टाटा), गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डीफॉलिया, विजयसार (टेरोकार्पस मार्सुपीयम), गुडमार (जीम्नेमा सिल्वेस्त्रे), मजीठ (रुबिया कार्डीयोफोईला) आणि मेथीका (ट्रायगोनेला फोएनम ग्रेसियम) यांचा समावेश आहे. या सहाही औषधी वनस्पतींचे वेगवेगळ्या प्रकारांनी संशोधन केल्यानंतर एकत्र करीत एक आयुर्वेदिक क्रांतीकारी गुण असलेल्या या ‘बीएचआर – ३४’ औषधाची निर्मिती करण्यात आली आहे.
डॉ. डी. एन. मणी म्हणाले, “बीजीआर – ३४ हे मधुमेहा पासून ग्रस्त व्यक्तीचे आयुष्य व्यवस्थापित करणारे एक अद्वितीय उत्पादन आहे. या औषधाचा परिणाम पाहण्यासाठी अनेक मधुमेहाच्या रुग्णांवर याचे प्रयोग करण्यात आले. ज्या मधुमेहाच्या रुग्णांवर हे प्रयोग करण्यात आले त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळाले. याशिवाय याची तुलना इतर मधुमेहाच्या औषधांच्या प्रमाणाबरोबर केली असता अॅलोपॅथी औषधांपेक्षा या औषधाचे परिणाम थक्क करणारे दिसून आले हे विशेष. याबरोबर या औषधाने एलएफटी, केएफटी आणि लिपीड प्रोफाईल यांच्यामध्येही सुधारणा झालेली पहायला मिळाली. मात्र या औषधाच्या चाचणीदरम्यान रुग्णावर कोणतेही प्रतिकुल परिणाम पहायला मिळाले नाहीत.”
गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि वितरण क्षेत्रात नावाजलेल्या एमिल फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीला ‘बीजीआर -३४’ अर्थात ब्लड ग्युकोज रेग्युलेटर या मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तांत्रिक दृष्ट्या असलेल्या सक्षमतेबरोबरच गुणवत्तापूरक आयुर्वेदिक उत्पादनासाठी मुख्यत: ही कंपनी ओळखली जाते. त्यामुळे कंपनीतर्फे होणारे ‘बीजीआर -३४’ चे उत्पादन हे गुणवत्तापूर्ण असेल यात शंका नाही.
याविषयी बोलताना एमिल अर्थात एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया लि. चे संचालक एस. पी. श्रीवास्तव म्हणाले की, सामान्यांना फायदा मिळण्याच्या दृष्टीने या प्रतिष्ठीत संस्थांनी तयार केलेल्या या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी आमच्यावर सोपावली गेली आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. देशात सगळीकडे भक्कम विपणन वितरण नेटवर्क असल्यामुळे एमिल संपूर्ण देशातील व परदेशातील मधुमेही ग्रस्त लोकांपर्यंत या अपूर्व शोधाचे लाभ पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.