रेमडेसिवीरचे टेंडर फिसकटले, कमिशनही बुडाले म्हणून ज्यांनी कुभांड रचले, त्यांचे आज, त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांनी तोंड फोडले

Date:

प्रविण दरेकरांची टीका

मुंबई-रेमडेसिवीरचा साठा सरकारकडेच येणार आहे, महाराष्ट्रात असा कोणताही साठा नाही, हे सांगून आम्ही दमलो. आता अधिकृतरित्या ते जगासमोर आले आहे. मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीच “असा कोणताही साठा महाराष्ट्रात नाही, दमणच्या कंपनीकडून साठा सरकारलाच मिळणार होता”, असे स्पष्टपणे सांगुन महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रेमडेसिवीरचे टेंडर फिसकटले, कमिशनही बुडाले म्हणून ज्यांनी कुभांड रचले, त्यांचे आज, त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांनी तोंड फोडले, अशी जळजळीत टीका विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी केली.
रेमडेसिवीरचा अनधिकृत साठा महाराष्ट्रात आहे, देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी पोलिसांवर दबाव आणला, साठ्याची चौकशी करा, अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडी सरकारमधील बाळासाहेब थोरात, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील आदी नेते सातत्याने करीत होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि नाना पटोले यांनी देखील भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी खुलासा केला. या संदर्भात दरेकर माध्यमांशी संवाद साधत होते.

श्रेयामागे पळणारे, त्यासाठी बिनबुडाचे आरोप करणारे, आघाडीतील नेते आता महाराष्ट्राची माफी मागणार का?
दरेकर म्हणाले की, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, रेमडेसिवीरचा साठा सरकारकडेच येणार आहे, ब्रूक फार्मा कंपनीने कोणताही साठा महाराष्ट्रात नेलेला नाही, ते महाराष्ट्राला मदत करीत आहेत, दमणला गेल्यापासून आम्ही मंत्री राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, सचिव या सर्वांशी संपर्कात होतो, राजेंद्र शिंगणे हे देखील परवान्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होते. पण ज्यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत साठा महाराष्ट्राला मिळणार आहे, हे लक्षात आले त्यावेळी आघाडीच्या पक्षातील काही नेत्यांचा अहंकार जागा झाला. त्याबरोबरच रेमडेसिवीरसाठी टेंडर मागवले गेले पण कमिशनसाठी फायनल झालं नाही म्हणुन हे कुंभाड रचलं गेलं. मी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना धन्यवाद देईन की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य परिस्थिती आणली. त्यांनी हे स्पष्ट केलंय की, महाराष्ट्रात असा कोणताही साठा नाही, दमणच्या कंपनीकडून सरकारलाच साठा मिळणार होता. नवाब मलिक, दिलीप वळसे -पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि प्रियंका गांधी महाराष्ट्राची माफी मागणार का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

महामारीच्या काळात रेमडेसिवीर वाटपाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवा
नवाब मलिक यांनी अमळनेरच्या घटनेबाबत केलेल्या आरोपाचा खुलासा करताना दरेकर म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर आरोप आहेत ते त्या कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर आहेत, निर्यातबंदीपूर्वी त्यांचा व्यवहार झालेला होता. तरी देखील कुणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. महामारीच्या काळात जनतेचे जीवित महत्त्वाचे आहे, त्यामुळे कायद्याचा बडगा उगारण्यापेक्षा मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या प्रकरणात नेमके काय झाले माहीत नाही पण तेथील जनता किंवा मृत्यूच्या छायेखाली असलेला रुग्ण इंजेक्शन पुरवणाऱ्याना दुवाच देत असतील. त्यामुळे ज्या सरकारला उपाययोजना करता आल्या नाहीत ते सरकार कारवाईची भाषा करीत आहे, हे दुर्दैवी आहे. सरकार पुरेशी इंजेक्शन उपलब्ध करून देत नाही. मग जो काही पुरवठा सरकारला झाला त्यापैकी सरकारने किती रुग्णालयांना, मेडिकल दुकानांना, महानगरपालिकांना, किती प्रमाणात इंजेक्शन दिली, त्यापैकी आता किती शिल्लक आहेत, याचा लेखाजोखा सरकार जनतेला देणार का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

रोहित पवारांना रेमडेसिवीर साठा कुठून मिळाला
रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात इंजेक्शनचे वाटप केले होते. याचा संदर्भ घेऊन दरेकर म्हणाले की, दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना चार बोटं आपल्याकडे असतात, याचा विसर नवाब मलिक याना पडलेला दिसतो. राष्ट्रवादी वेल्फेअर बोर्डाच्या वतीने युवा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बाबर व माजी नगरसेवक दीपक राज यांच्याकडे इंजेक्शनचा साठा देण्यात आला. राष्ट्रवादी वेल्फेअर बोर्डाकडे किंवा रोहित पवार यांच्याकडे इंजेक्शनचा साठा कुठून आला, याची सरकारने चौकशी केली का, त्यांना साधी नोटीस तरी पाठवली का ? पण आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट ही या सरकारची प्रवृत्ती आहे. दरेकर यांनी बोगस इंजेक्शन रॅकेटचा उल्लेख करताना सांगितले की, दस्तुरखुद्द बारामतीच्या काठेवाडी येथे रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटेमॉलपासून बनवलेल्या 35000 बनावट इंजेक्शनचा पर्दाफाश झाला. त्यामधील एक आरोपी दिलीप गायकवाड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याचीही चौकशी झाली नाही. आपल्या अपयशाचा फोकस दुसरीकडे नेण्यासाठी चार-पाच दिवस रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा वाद घातला गेला. नवाब मलिक यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन इंजेक्शनचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवावा आणि कार्यकर्त्याना किती इंजेक्शन दिली, याचीही माहिती द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी कुणी खरेदी केल्या
नवाब मलिक यांनी आमदार प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांच्यावर देखील आरोप केले होते. त्याचा धागा पकडून दरेकर यांनी मलिक यांच्यावर आज गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी कुणी खरेदी केल्या याची सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. परंतु, कोविड सारखी नाजूक परिस्थिती असल्यामुळे आम्ही तो विषय बाहेर काढलेला नाही. परंतु, दरेकर यांनी असा इशारा दिला की, ही नाजूक परिस्थिती सावरल्यानंतर एकेक प्रकरण आम्ही महाराष्ट्रासमोर आणणार आहोत. आपल्या जावयाला झालेली अटक आणि कारवाईमुळे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन मलिक यांनी वक्तव्य केलेली आहेत. राजकिय युद्ध योग्य वेळी, योग्य ठिकाणी खेळता येईल, आता ती परिस्थिती नाही, अशी समजही दरेकर यांनी मलिक याना दिली. जनतेसमोर यांच्या राजकीय कुरघोड्या उघड झालेल्या आहेत, यांची पुरती नाचक्की झालेली आहे, त्यामधून सावरण्याचा प्रयत्न नवाब मलिक करताना दिसत आहेत,अशी टीकाही दरेकर यांनी केली.
केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदत पण महाविकास आघाडीकडून केंद्रावर नाहक आरोप
केंद्र सरकार महाराष्ट्राची अडवणूक करते, अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडी सरकारकडून होत असतात. याबाबत दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांसमोर परिस्थिती मांडली, काही कंपन्यांशी बोलून महाराष्ट्रासाठी काही इनजेक्शनचा वाटा राखीव ठेवावा, अशी भूमिका मांडली, दुसरीकडे काल-परवा 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली, 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान महोदयांनी केली. म्हणजे केंद्र सरकार सर्वतोपरी मदत महाराष्ट्राला करीत आहे. राज्य सरकारने त्याचे श्रेय केंद्राला देण्याचे सोडा, किमान राजकारणापोटी केंद्राला दूषणे देण्याचं काम तरी करू नये, एव्हढीच आमची विनंती आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी राज्य सरकार 32 टॅंकर पाठवणार होते, पण 10 टँकर सुद्धा सरकार पाठवू शकले नाही. अशा प्रकारचे अनेक अपयश आम्ही जनतेसमोर मांडतो, त्याचे या सरकारला दुःख आहे. अशीही टीका दरेकर यांनी केली.
रोहित पवार, आणि बारामती बनावट इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करा
दरेकर यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले . ते म्हणाले की, रोहित पवार यांच्याकडे इंजेक्शनचा साठा कुठुन आला, राष्ट्रवादीच्या ट्रस्टकडे कुठून आला, बनावट इंजेक्शन तयार करणाऱ्या बारामती येथील टोळीविरुद्ध सरकारने काय कारवाई केली, याचीही उत्तरे जनतेला मलिक यांनी द्यावीत.

रेमडेसिवीर इंजेक्शन वादात दूध का दूध और पानी का पानी झाले आणि सरकार उघडे पडले
दरेकर यांनी असेही सांगितले की, रेमडेसिवीर प्रकरणात दूध का दूध और पानी का पानी झालेलं आहे. परंतु, दमणच्या कंपनीच्या मालकाला वाझेस्टाईल अटक करण्यात आली, त्यांना त्यांच्या घरातून ज्या पद्धतीने 11 जणांनी उचलून नेलं, पार्ला पोलिस स्टेशनमधून डीसीपी कार्यालयात नेलं गेलं, त्यावरून घरच्यांना वाटलं की याचा देखील मनसुख हिरेन करतील की काय. लोक मरत असताना हे सरकार राजकारण करीत आहे. परंतु, हे सरकार महाराष्ट्रातील जनतेसमोर उघडे पडलेले आहे आणि दस्तुरखुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी याची स्पष्टता केली आहे, डीसीपी यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकारची अब्रू वाचवण्यासाठी केंद्राला नावे ठेवणे, कारवाईची भाषा करणे, राजकारण करणे, असले प्रकार सरकार करीत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...