पुणे: क्रेडाई पुणे-मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच मॅनेजमेंट कमिटीच्या काही सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन टीडीआर धोरणांविषयी काही मुद्दे नोंदविले. सदर मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची भावना शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाने टीडीआर धोरणांसाठी काही सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून क्रेडाई पुणे-मेट्रोने काही सूचना व हरकती शासनाकडे दाखल केल्या होत्या. राज्यशासनाने २८ जानेवारी रोजी नवीन टीडीआर पॉलिसी जारी केली, परंतु त्यांचे अंतिम टीडीआर नोटीफिकेशन व प्रसारित केलेल्या धोरणांमध्ये तफावत आहे.
राज्य शासनाकडून नवीन टीडीआर धोरण प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल क्रेडाई पुणे- मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया व मॅनेजमेंट कमिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील दौऱ्या दरम्यान ३१ जानेवारी रोजी भेट घेतली. त्यावेळी त्यांना टीडीआर धोरणांचा होणाऱ्या परिणामांची कल्पना देण्यात आली; तसेच, धोरणांच्या अंमल बजावणीबद्दल अडचणीदेखील सांगण्यात आल्या. हे सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेने ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
अशीच बैठक मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकारयांसोबत करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांना जुन्या नियमानुसार टीडीआर मिळाला आहे त्यांना जुनेच नियम लागू करावेत, रस्तारुंदीच्या अनुषंगाने टीडीआर मंजूर करावा तो प्लॉट क्षेत्रफळानुसार करू नयेत, कारण त्यामुळे छोट्या प्लॉट धारकांचे नुकसान टाळता येईल. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांची पुनर्बांधणीच्या प्रकल्पांना ९ मीटर रस्तारुंदीचा नियम शिथिल करण्यात यावा, त्यांच्यासाठी जुने नियमच लागू करावेत. त्याचप्रमाणे रस्तारुंदी व आरक्षणाने बाधित झालेल्या मिळकतीबाबत सहानुभूती दाखवून, अशा क्षेत्राचा कमाल टीडीआर मर्यादेच्या वर वापरण्यास परवानगी मिळावी. अश्या काही मागण्या यावेळी अधिकारयांसमोर मांडण्यात आल्या.
या बैठ्कीमधील अधिकाऱ्यांशी करण्यात आलेली चर्चा सकारात्मक होती. सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून, सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले . तसेच पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन व डीसीआर (DCR) लवकरात लवकर मंजूर करण्याचे आश्वासनही त्यांनी या बैठकीमध्ये दिले.


