पुणे– क्रेडाई पुणे मेट्रोने आयोजित स्पेन पोर्तुगाल अभ्यास दौऱ्यामध्ये पुण्यातील ५० रिअल ईस्टेट डेव्हलपर्स सहभागी झाले होते. नविन तंत्रज्ञान व स्मार्ट सिटीचा विकास, परवडणारी घरे, जेष्ठ नागरीकांसाठीची घरे, पर्यावरणपूरक बांधकामे, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, नवीन आर्किटेक्चरचे डिझाईन इ. आणि अशा विविध विषयांवरील अभ्यास हे या दौऱ्याचे प्रमुख उद्दीष्ट होते.
या दौऱ्याविषयी बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, क्रेडाई नेहमीच अशा प्रकारच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करत असते, यामुळे क्रेडाईच्या सदस्यांना नवीन तंत्रज्ञान, बांधकाम पध्दती, सुरक्षा आणि पर्यावरण मानकांचा परिचय होतो आणि त्यांना या तंत्रज्ञानाचा त्यांच्या बांधकामावेळी उपयोग करता येतो. अशा नवकल्पनांमुळे बांधकामची गुणवत्ता सुधारते, बांधकाम खर्च कमी करता येतो साहजिकच यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा होत असतो.
ते पुढे म्हणाले की, आम्ही स्थानिक, राज्य व केंद्र सरकार कडे अभ्यास दौऱ्यामधील काही सर्वोत्तम पध्दती सादर करणार आहोत. जेणेकरून भारतामध्येही ते या पध्दतींची अमंलबजावणी करू शकतील.
अभ्यास दौऱ्यामधील सहभागी अरूण गुप्ता म्हणाले की, यावेळी आम्ही युरोपीयन देशांमधील स्पेन-पोर्तुगाल निवडले कारण त्यांच्याकडे सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन करण्याची एक संस्कृती आहे. त्यांचे विकासक, वास्तुशास्त्रज्ञ, डिझाइनर, अभियंते आणि सरकारी संस्था नेहमी चौकटी बाहेर विचार करून फक्त गृहनिर्माणाची गुणवत्ताच सुधारत नाही तर नागरीकांच्या राहणीमानाचा दर्जाही सुधारत असतात.
अभ्यास गट आयोजक केतन रूईकर म्हणाले की, जुन्या इमारती येथे नावीन्यपुर्ण पध्दतीने बांधल्या गेल्या आहेत. त्यातील वैशिष्ट्य म्हणजे हेरीटेज इमारती या बाहेरून त्यांचा कायापालट न करता आतील भाग पुर्ण नवीन तंत्रज्ञानानी विकसित केला जातो.
या दौऱ्याविषयी माहिती देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे संचालक डॉ.अभ्यंकर म्हणाले की, आम्ही व्हॅलरसुल कचरा व्यवस्थापन प्रकल्पालाही भेट दिली. तेथे गेल्यावर आम्हाला कचरा व्यवस्थापनाची साखळी, पुनर्वापर आणि पुनर्प्राप्ती चे व्यवस्थापन आणि तांत्रिक गोष्टी समजून घेता आल्या. ज्या कचऱ्याचे विघटन होत नाही अशा प्रकारच्या कचऱ्याचे ते जाळून उर्जा तयार करतात. नैसर्गिक संपत्ती वाचविण्यासाठी ही कंपनी तीन ‘आर’ मध्ये विश्वास ठेवते रीयुझ, रीसायकल आणि रीड्युस
या दौऱ्यानिमित्त पोर्तुगाल येथील भारतीय दुतावास मधील प्रतिनिधी के नंदिनीसिंगला यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत व्दिपक्षीय व्यवहारावर चर्चा करण्यात आली सोबतच क्रेडाईच्या या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले आणि आवश्यक गोष्टींसाठी पाठींबा देण्याचेही मान्य केले.
या अभ्यास दौऱ्यामध्ये स्पेन मधील बिल्बो येथे दोन दशकामध्ये जुने इंडस्ट्रीयल पोर्ट टाउन स्मार्ट सिटी मध्ये कसे विकसित करण्यात आले याविषयी माहिती घेण्यात आली, तसेच पोर्तुगालमध्ये गोल्डन व्हिसा या आकर्षक योजनेची माहिती मिळाली ज्यामध्ये जो व्यक्ती रिअल ईस्टेट पुनर्विकास प्रकल्पासाठी ३.५ लाख युरो गुंतवणूक करू शकतो किंवा ५ लाख युरोची नविन जागा विकत घेऊ शकेल अशा कोणत्याही परकीय व्यक्तीला येथे पोर्तुगाल सरकार कडून पोर्तुगिझ व्हिसा देण्यात येतो. हा गोल्डन व्हिसा जगभरातील उच्च गुंतवणूकदाराला आकर्षित करत आहेत. ते फक्त गुंतवणूक न करता त्या देशाशी व्यावसायिक संबंधही प्रस्थापित करत आहेत. यामुळे तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळत आहे.