पुणे – स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. नियोजनाची पुर्तता झाल्यास २०२० पर्यंत शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा प्राप्त होईल, अशी ग्वाही पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
क्रेडाईच्या ईसी-जीसी या राष्ट्रीय परिषदेत ‘स्मार्ट सिटीचे लक्ष्य’ याविषयावर ते बोलत होते. हॉटेल वेस्टन, कोरेगाव पार्क येथे क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे दोनदिवसीय परिषद भरविण्यात आली होती. यावेळी दुसऱ्या दिवशाच्या सुरुवातीस कुमार यांनी स्मार्ट सिटी पुढील प्रमुख आव्हाने, अडथळे आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना यांवर प्रामुख्याने उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी क्रेडाई-नॅशनलचे चेअरमन इरफान रझाक, क्रेडाई-नॅशनलचे अध्यक्ष गीतांबर आनंद, क्रेडाई-नॅशनलचे उपाध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे-मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कुमार म्हणाले की, आर्थिक सुबकता आणणे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे आणि संभाव्य परिस्थितीत तग धरण्याची ताकद निर्माण करणे ही प्रमुख तीन आव्हाने आमच्यासमोर आहेत. यासाठी स्मार्ट सिटी विषयी असणारे समज-गैरसमज बाजूला सारून समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खासगी गुंतवणूक हा महत्वाचा घटक असून आपण शांघाय आणि लंडन सारख्या शहरांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा करताना वाहतूक सुरक्षा, वाय फाय व संगणकप्रणालींनी सुसज्ज बीआरटी स्थानके, पुढील 3 वर्षांत सायकलींचे शहर ही मूळ ओळख पुण्याला प्राप्त करून देणे आदी बाबी केंद्रस्थानी ठेऊन येत्या 6 महिन्यात आवश्यक त्या कामांना गतिमानता देण्यात येणार आहे. याबरोबरच 2020 पर्यंत अखंडित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, ई गव्हर्नन्स सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले.
पुढील सत्रात वारसा हक्क नियोजनाचे महत्व पटवून देताना सुनील त्यागी म्हणाले की, ‘पुढील पिढीत वाद होवू नये यासाठी मृत्यूपत्र तयार करताना विशेष ती काळजी आपण घ्यावी. यामध्ये समान हक्क व पारदर्शकता हवी. संपत्ती संरक्षण व हस्तांतरण करताना पुढील पिढीला मुद्रांक शुल्क व कराचा अतिरिक्त बोजा पडणार नाही याची देखील दक्षता घ्यावी.’
परवडणारी घरे, प्रधानमंत्री आवास योजना याविषयी सचिन कुलकर्णी आणि सचिन अगरवाल यांनी मार्गदर्शन केले. ‘पुणे रियल इस्टेस्ट मार्केट सर्व्हे याविषयी रोहित गेरा यांनी सादरीकरण केले. प्रश्नोत्तराच्या सत्राने परिषदेची सांगता झाली.
यावेळी क्रेडाईच्या २३ राज्य फेडरेशन आणि १६४ शहर अध्यक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एकत्रित प्रयत्नातूनच स्मार्ट सिटी साकारेल: कुमार
क्रेडाई पुणे मेट्रोच्या स्वच्छतागृह उभारणी उपक्रमाचे कौतुक यावेळी कुमार यांनी केले. असाच सकारात्मक सहभाग विकसकांचा लाभल्यास आपण एकत्रित प्रयत्नातून स्मार्ट सिटीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकतो, असा आशावादही यावेळी कुमार यांनी व्यक्त केला.

