पुणे :- कुशलता दिवसाचे औचित्य साधत बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या व्यावसायिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी काल कुशल क्रेडाई पूर्व-राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्धघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
यावेळी क्रेडाई नैशनलचे अध्यक्ष गीतांबर आनंद,कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ,क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, जितेंद्र ठक्कर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बापट म्हणाले की,पूर्वीच्या काळातील बांधकामाचा दर्जा चांगला असल्यामुळे त्या इमारती आजही चांगल्या स्थितीत आहेत. आजच्या बांधकामातही असाच दर्जा व्यावसायिकांनी जोपासायला हवा. कुशल अशाच प्रकारचे प्रशिक्षण कामगारांना देत आहे.
आजच्या जगात कुठल्याही क्षेत्रात कारागिरामध्ये कुशलता महत्वाची असते. बांधकाम क्षेत्रात तर पदोपदी याची जाणीव होते. या कामगारांना कुशलच्या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणानंतर त्यांच्या कामाचा दर्जा अधिक उंचावत आहे. क्रेडाई कुशलने अशाच प्रकारे कुशल कामगार घडवावेत, अशी भावना गीतांबर आनंद यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेमध्ये देशातल्या विविध शहरातील ३५ कामगारांनी भाग घेतला होता. ब्रिक लेईंग मध्ये महिला कामगार नगमा शेख आणि टायलिंग मध्ये सवारत संजय कुमार यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना मेडल, प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने गौरविण्यात आले. तसेच विजयी झालेल्या १६ स्पर्धकांना दिल्ली येथे १७ आणि १८ जुलै ला होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत भाग घेता येणार आहे.