मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. अनिल देशमुख यांना हृदय विकाराचा त्रास होता, यावर उपचार घेण्यासाठी त्यांनी त्यांना सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.
अनिल देशमुख आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. ईडीच्या प्रकरणात त्यांना 4 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण, त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केल्याने अद्याप या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही. सीबीआयकडून जामीन मिळेपर्यंत, त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.
दरम्यान, अनिल देशमुख यांना हृदय विकाराचा त्रास आहे. त्यांनी अँजिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाला केली होती. त्यावर सुनावणी घेताना मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यासाठी दाखल केले जाईल.

