पुणे : कोरोना रुग्ण फेब्रुवारी पासून धडाधड वाढताहेत , साहेब खबरदारी घ्या , उपाय योजना करा असे साकडे महापालिका आयुक्तांना घालायला आज कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते आबा बागुल, माजी महापौर कमलताई व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, पक्षाचे शहर सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर, सोशल मिडियाचे शहर अध्यक्ष अनिस खान यांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या कार्यालयात धडकले होते. यावेळी कोविड रुग्णांसाठी आणखी एक हजार बेडस् वाढविण्यात येत आहे, तसेच शहरातील सामाजिक संस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.
महापालिकेच्याच माहितीनुसार जवळपास ४ हजार कोविडचे रुग्ण दैनंदिन आढळत आहेत आणि सध्या ६५०हून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे या गंभीर स्थितीकडे कॉंग्रेस ने या निवेदनातून लक्ष वेधले आहे. रुग्णालयनिहाय बेडस्ची उपलब्धता आणि व्हेटिंलेटर बेडस् संख्या, जम्बो हॉस्पिटलची सद्यस्थिती, प्लाझमा तुटवडा याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती द्यावी, महापालिकेच्या डॅश बोर्डवर प्रत्येक रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेट बेडची संख्या याची माहिती अद्ययावत द्यावी, टोल फ्री नंबरची संख्या वाढवावी,कॉर्डियॉक रूग्णवाहिकेची व्यवस्था करावी, डॉक्टर्स,नर्सेस अन्य वैद्यकीय स्टाफची पुरेशी व्यवस्था व्हावी, कोविड रुग्णालयासाठी अधिकारी नेमून त्यांचे नांव आणि नंबर जाहीर करावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. डायलेसिस कराव्या लागणाऱ्या कोविड बाधितांसाठी स्वतंत्र व्यवस्था व्हावी अशीही मागणी करण्यात आली. लसीकरण मोहीमेला वेग द्यावा असेही शिष्टमंडळाने सुचविले. सध्या लसीकरणासाठी १३ हजार वायल उपलब्ध आहेत, पुण्याला २६ लाख वायल मिळावेत अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे आयुक्तांनी दिली. जम्बो हॉस्पिटलची क्षमता दुप्पट करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ज्या हॉस्पिटलमध्ये लिफ्ट नाहीत तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था तळमजल्यावर करावी ही मागणीही आयुक्तांनी मान्य केली.
या सर्व मागण्यांना आयुक्तांनी प्रतिसाद दिला. डॉक्टर्सची संख्या वाढविणे, टोल फ्री नंबर दुप्पट करणे याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये ३३० बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिली.
कोरोना रुग्ण वाढताहेत : साहेब उपाययोजना करा .. कॉंग्रेसचे पालिका आयुक्तांना साकडे
Date:

