पुणे- कोरोना ने मृत्युमुखी पडलेल्यांची स्मृती जपून त्यापासून आगामी वाटचालीस प्रेरणा मिळावी या हेतूने पुण्यात ‘कोरोना स्मारक ‘ उभारावे असा प्रस्ताव कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेपुढे ठेवला आहे. मात्र दुर्दैवाने महापालिकेच्या मुख्य सभा कोरोना आल्या पासून आजतागायत चालविल्या गेलेल्या नाहीत . सातत्याने ओंन लाईन झालेल्या कोणत्याही मुख्य सभेत काहीही कामकाज होऊ शकलेले नाही
दरम्यान या संदर्भात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,’ गेल्या सुमारे ०९ (नऊ) महिन्यापासून जग, देश, महाराष्ट्र आणि पुण्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला त्यात लाखो नागरिक बळी पडले आहेत. ही अत्यंत दुखद व वेदना देणारी बाब आहे. पुणे शहरातही कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव होऊन हजारो पुणेकर मृत्युमुखी पडले. या सर्वाना चांगली वैद्यकीय सेवा द्यावी. या कोरोना विषाणूवर उपचार व्हावे. यासाठी पुणे महानगरपालिकेच्यावतीने त्यांचे डॉक्टर, नर्सेस, स्टाफ यांनी शर्तीचे प्रयत्न केले तसेच खाजगी हॉस्पिटल मधील व राज्यसरकारच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस, स्टाफ व प्रशासनाने देखील खूप प्रयत्न केले, त्यामुळे अनेक जीव वाचले हे देखील सत्य आहे.
मात्र जे रुग्ण कोरोना व्याधीमुळे त्रस्त होऊन त्या व्याधीवर मात करू शकले नाहीत, त्यांना दुर्दैवाने मृत्युला सामोरे जावे लागले हि दुर्दैवी बाब आहे. आता जसा जसा काळ जाईल तसा तसा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील आटोक्यात येण्याची अपेक्षा आहे. त्याच्यावर औषध आल्यानंतर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील कमी येईल अशी आशा आहे. कोरोना कायमचा नष्ट होईल असे नसले तरी त्याचा प्रभाव अगदी एक – दोन वर्षात खूपच कमी होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवरती युद्धात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांचे जसे आपण स्मारक तयार करतो व श्रद्धांजली वाहतो त्याप्रमाणे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात मृत्युमुखी पडलेल्या पुणेकरांची आठवण राहावी व त्यांना श्रद्धांजली वाहता यावी, यासाठी स्मारक उभारण्यात यावे. पुण्यात पहिला कोरोना रुग्ण ज्या दिवशी सापडला तो दिवस पुण्याच्या दृष्टीने ‘कोरोना दिवस’ म्हणून पाळला तर औचित्यपूर्ण होईल असे आम्हास वाटते.
हे स्मारक केल्यास त्यापासून प्रेरणा घेऊन पुण्याची सार्वजनिक आरोग्यसेवा व संसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करता येईल. यासाठी कश्या पद्धतीने योजना अमलात आणण्यात येईल. त्याचाही संकल्प वेळोवेळी करता येईल. याविषयी मुख्य सभेने मान्यता द्यावी.
असा ठराव मुख्य सभेस .आबा बागुल व सभासद रफिक शेख यांनी दिला आहे.

