कोरोनाने मृत सेवकांच्या वारसांना मदतीच्या घोषणा एक प्रत्यक्षात मदत मात्र वेगळीच
पुणे- महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन प्रातिनिधीक स्वरुपात ५ दिवंगत सेवकांच्या वारसांना प्रत्येकी .रु. २५ लाखाचे अनुदान देण्यात आले. वास्तविक पाहता महापालिकेतील सेवक जर कोरोनाने मृत झाला तर त्याच्या वारसांना १ कोटीची मदत देण्याची घोषणा गेल्या वर्षीच उत्साहाच्या भरात करण्यात आली होती . पण प्रत्यक्षात हि घोषणाच आता सत्ताधाऱ्यांच्या अडचणीची ठरली आहे त्यामुळे यावर पडदा टाकून आता २५ लाखाचे अनुदान असा शब्द वापरून हि मदत केली जात आहे ,जाणार आहे.
पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीतून कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन दिवंगत सेवकांच्या वारसास कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना लागू करण्यात आली आहे. माहे डिसेंबर २०२० अखेर ५१ (४७ कायम, ४ कंत्राटी) अधिकारी/ सेवकांचा कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) संसर्ग होऊन दिवंगत झाले आहेत. सदर योजने अंतर्गत सर्व मृत सेवकांचे वारसांना र.रु. २५ लाख अनुदान देणेकामी शिफारस केली आहे.
दि. ३१/३/२०२१ रोजी महापौर, मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते त्यांचे दालनात प्रातिनिधीक स्वरुपात ५ मृत सेवकांचे वारसांना र.रु. २५ लाखाचा धनादेश, सन्मानपत्र व शाल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उर्वरित वारसांना अनुदानाचे वाटप अलहिदा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास उपमहापौर श्रीमती सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेता गणेश बिडकर,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आबा बागुल, पृथ्वीराज सुतार, सुनिताताई वाडेकर, अजय खेडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल,मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर व इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

