पुणे : घरातील बिकट परिस्थितीवर मात करून मंगोलिया येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या महेंद्रचे काम सध्याच्या तरुणांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महेंद्र चव्हाण याला पालकमंत्री गिरीश बापट यांनी १ लाख रुपये देवून सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, मुळचे चिपळूण तालुक्यातील तळसर येथे राहणाऱ्या महेंद्रचे आई वडील अपंग आहेत. त्याचबरोबर त्याची घरची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत महेंद्र पुण्यात त्याच्या नातेवाईकांकडे राहण्यास आला. येथे आल्यानंतर त्याने सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये काम केल.
याकाळात तो या हॉटेल मध्येच राहत असे. त्यानंतर त्याला जनता वसाहतीत राहण्यासाठी थोडी जागा मिळाली. त्यानंतर त्याने बांधकाम मजूर म्हणून काम सुरु केल. लहान पानापासून त्याला व्यायामाची आवड असल्याने तो शरीरसौष्ठव या क्रिडा प्रकाराकडे आकर्षिला गेला. बांधकामावर दगड विटा उचलून तो वेटलिफ्टिंग करत होता. आज पर्यंत त्याला विविध स्पर्धेत २०० हून अधिक बक्षीस मिळाले आहेत.
जागतिक स्पर्धेत यश मिळवल्यानंतर त्याचा पुणेकरांकडून योग्य सत्कार झाला नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी त्याला पुढील आयुष्यासाठी उपयोगी म्हणून १ लाख रुपये देत असल्याचे सांगितले. ही सुरुवात असून भविष्यात राज्य पातळीवर तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आणखी मदत करण्याच आश्वासन त्यांनी दिले. अत्यंत कठीण परिस्थितीत महेंद्रने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. असं ही ते म्हणाले.
यावेळी बोलताना महेंद्र चव्हाण म्हणाला, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर जो आज सत्कार होत आहे. या सत्काराने मी भारावून गेलो आहे. स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यानंतर माझ्या साठी राष्ट्रगीत वाजवण्यात आलं तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. स्पर्धेचा अनुभव सांगताना तो म्हणाला, या स्पर्धेत जवळपास ४० देशांच्या ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
त्यामुळे ही स्पर्धा कठीण होती. पण मला माझ्यावर आत्मविश्वास होता. मला मिळालेल्या या यशाला शॉर्टकट नाही असे सांगत त्याने या यशा पाठीमागे गेल्या १५ वर्षाची मेहनत असल्याचे सांगितले.
जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान यांनी महेंद्र ला जिल्हा प्रशासनामार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले.