जालना – राहुल गांधी देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे असून ते कोणत्याच कामाचे नाहीत, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भागवत कराड यांची जनआशिर्वाद यात्रा शुक्रवारी सकाळी बदनापूर येथे आली तेव्हा मंत्री दानवे बोलत होते.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधींवर जोरादार टीका केली. राहुल गांधी देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे आहेत. हा वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल गांधींचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत. तर राहुल गांधी या पदासाठी निष्क्रीय आहेत, असे मंत्री दानवे यावेळी म्हणाले. दानवे यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. मात्र आपल्या भाषणाची सुसाट सुटलेली एक्सप्रेस आवरता न आल्याने वादग्रस्त वक्तव्य करीत दानवे यांनी पुन्हा एकदा रोष ओढून घेतला आहे.

