पुणे : आज माझा होणारा सन्मान हा मी माझ्यासोबत काम करणाऱ्या महिलांना अर्पण करत आहे. त्यांनी जर मला सहकार्य केले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. समाजसेवेमध्ये महिला कायमच अग्रेसर राहिल्या आहेत. समाजसेवेचे बाळकडू मला लहानपणापासून मिळाले. लग्नानंतरही कुटुंबीयांनी माझ्या समाजसेवेच्या कार्यामध्ये प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मला समाजकार्य अधिक प्रभावीपणे करता आले अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया यांनी व्यक्त केली.
एकल परिवारातर्फे अंजली तापडिया यांचा महेश गौरव सन्मान मिळाल्याबद्दल एकल परिवाराच्या वेस्ट झोन अध्यक्षा सरिता मानसिंगका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकल परिवारचे पुणे चॅप्टर अध्यक्ष वसंत राठी, अर्चना बेहेडे, पुरुषोत्तम लोहिया, अशोक नवल, अशोक लढा, दिनेश मुंडे, मनोज बेहडे आधी यावेळी उपस्थित होते.

अंजली तापडिया म्हणाल्या, सामाजिक कार्यामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सरिता मानसिंगका या वनवासी मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी गेल्या ३० वर्षांपासून अविरत काम करत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये महिला अधिक प्रभावीपणे योगदान देऊ शकतात याचे त्या मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहनही यावेळी अंजली तापडिया यांनी केले.
सरिता मानसिंगका म्हणाल्या, समाजामध्ये आजही विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक काम करण्याची गरज आहे. या क्षेत्रामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन काम केले तर देशांमध्ये सामाजिक सुधारणा अधिक वेगाने घडू शकते. एकल परिवार सामाजिक क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.
यावेळी दिनेश मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली एकल परिवाराच्या युवा संघटनेची स्थापना करण्यात आली. भाग्यश्री घारपुरे यांच्या नादश्री पुणे या संस्थेचा यावेळी संगीतमय दीपावली स्नेह संमेलन कार्यक्रम झाला. पद्मा तोगडिया यांनी सूत्रसंचालन केले. वसंत राठी यांनी प्रास्ताविक केले. डॉ अशोक लढ्ढा यांनी आभार मानले.