पुणे : सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार दर दोन महिन्यांनी विविध योजना जाहीर करते या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. भाजप कसबा मतदार संघाच्या वतीने येथील सरस्वती विद्यामंदिर येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी निराधार योजनेतील तसेच श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थांना आदेश पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला तहसीलदार अर्चना यादव,शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक महेश लडकत,दीपक पोटे,संजय गांधी निराधार योजना कमिटीचे भारत निजामपुरकर, अशा शिंदे, मुक्ता माने, क्रांती खांडेर, बापू नाईक, छगन बुलाखे, वैशाली नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला केंद्रात, राज्यात त्याचप्रमाणे महानगरपालिकेतही निवडून दिले. आता लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यांची पूर्तता करणे हे आपले कर्त्यव्य आहे. सर्व सामान्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. पण दुर्देवाने या योजना सामान्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिक वेळ देऊन या योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचवल्या पाहिजेत.प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 10 लाभार्थी तयार केले तर किमान 20 हजार लाभार्त्यांना आपण पुढील वर्षीपर्यंत लाभ मिळवून देऊ शकतो.
आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त पुढच्यावर्षी 20 हजार लाभार्त्यांचा मेळावा घेण्याचा संकल्प करूया. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.