पिंपरी : ता . ९ : “ पिंपरी-चिंचवडच्या विकासात एक दिवसही वाया घालवणार नाही. येथील पाण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत, कचर्यापासून ते आरोग्यापर्यंतचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आपल्या कार्यातून जनतेची शाबासकी मिळवू, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी जनतेला दिले.
आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या महापौर व उपमहापौरपदासाठी महानगरपालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महापौर पदासाठी नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांना भाजपने संधी दिली. तर एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. आमदार महेश लांडगे यांच्यासह नवर्निवाचित नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले की, लोकांच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहे. येत्या पाच वर्षात या शहराचा नियोजनबद्ध विकास आम्ही करणार असून शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नेते व कार्यकर्ते एक टीम म्हणून काम करतील. या शहरासाठी एक सुनियोजित व्यवस्था आम्ही राबविणार आहोत. आज औद्योगिकनगरीतील महापौर पदासाठी नितीन काळजे यांच्या रूपाने युवा नेत्यास संधी देत आहोत. चऱ्होलीसारख्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ते गेली १५ वर्षे कार्यरत असून या अनुभवातून ते पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या मार्गी लावतील, असा विश्वास वाटतो. तर महापालिकेतील आणि पक्ष संघटनेतील कामकाजाचा अनुभव पाहून एकनाथ पवार यांची गटनेतेपदी आम्ही निवड करत असून शैलजा मोरे यांच्या रूपाने महिला उमेदवारास उपमहापौर पदाची संधी देत आहोत.या निवडीतून आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या भ्रष्टाचाराला कंटाळून पिंपरी-चिंचवडवासियांनी भारतीय जनता पक्षाला कौल दिला तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू, अशी ग्वाही देत पालकमंत्री बापट यांनी काळजे, पवार व मोरे यांचे अभिनंदन केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेही उमेदवारी अर्ज भरले असले तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. येत्या १४ मार्चला औपचारिक घोषणा फक्त बाकी असेल.