पुणे : पालक मंत्री गिरीश बापट यांनी आज सिंचन भवन येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीबरोबरच कृष्णा खोरे महामंडळा अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांच्या सध्यस्थिती बाबत माहिती घेतली.
या बैठकीस महाराष्ट्र कृष्णा खारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. रा.ब.घोटे, श्री. वि.ग. राजपूत, मुख्य अभियंता (विप्र), श्री. सं.द. चोपडे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ यांचेसह कार्यकारी अभियंते व विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत श्री. रा.ब.घोटे, कार्यकारी संचालक यांनी महामंडळांतर्गत सर्व प्रकल्पांचे या वर्षीचे पाणीसाठे व गतवर्षीचे पाणीसाठे याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. त्याचप्रमाणे पुणे पाटब्ंधारे मंडळ अधीक्षक अभियंता,श्री चोपडे यांनी पुणे जिल्हयातील या वर्षीचे पाणीसाठे व गतवर्षीचे पाणीसाठे याबाबत तुलनात्मक माहिती दिली.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरांसाठी पिण्याचे पाणी पुरवठ्याकरीता धरणातील पाणीसाठ्यांची सद्यस्थिती श्री बापट यांनी जाणून घेतली व धरणातील असलेले पाणीसाठे आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी राखून ठेवण्यात यावेत व उर्वरित पाणीसाठ्यांचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नियोजन करुन अत्यंत काटेकोरपणे पाणी वापरावे, असे निर्देश मा.पालकमंत्री यांनी दिले.
खडकवासला प्रकल्पाच्या जुन्या मुठा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. मुख्यत्वेकरुन या कालव्यावरील पुलांच्याकामाची माहिती त्यांनी घेतली व सर्व उर्वरित दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जुन्या मुठा उजव्या कालव्यावरील उर्वरित कामांचे जे प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर केलेले आहेत त्या प्रस्तावांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करुन मान्यता देण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना श्री. बापट यांनी दिल्या. यांत्रिकी विभागाच्या मशिनरींमार्फत पुणे जिल्हयातील कालव्याची दुरुस्ती करुन सर्व कालवे प्रणाली सुस्थितीत ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी यांनी दिल्या.
कृष्णा खोरे महामंडळांतर्गत सुरु असलेल्या बांधकामाधीन प्रकल्पांची प्रकल्पनिहाय सखोल आढावा पालकमंत्र्यांनी घेतला व कामे लवकर पुर्ण करण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या.
मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी पिण्याला मिळणेबाबतच्या विषयाबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. याबाबत टाटा पॉवर व भारत सरकार यांचेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या करारनाम्याबाबत चर्चा झाली. या करारनाम्यातील तरतुदींचा अभ्यास करुन जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पाणी हा विकासाचा महत्वाचा घटक असल्यामुळे पाणी साठ्यांचा वापर अत्यंत काटकसरीने करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देऊन जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

